नागपूर/प्रतिनिधी:
वाहतूक पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारून आठ दिवस होत नाही, तोच बुधवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून त्यांनी लगेच पदभार स्वीकारला. संभाजी कदम यांची पुणे येथे बदली झाल्यामुळे गुन्हे शाखेचे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी भरणे यांची बदली करण्यात आली आहे.गेल्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच गुन्हे शाखेला आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळाला.
दरम्यान भरणे यांच्या जागी पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे वाहतुकीचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे.परिमंडळ चार येथे उपायुक्तपदी असताना नीलेश भरणे यांनी त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले होते. त्यानंतर त्यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती.
वाहतूक शाखेत येताच त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत क्रिकेट सामन्यादरम्यान वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आखले. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नीलेश भरणे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.