चंद्रपूर/प्रतीनिधी:
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमलेले निवडणूक निरीक्षक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले असून नागरीक, मतदारांना काही तक्रार, निवेदन अथवा अडचणी असल्यास निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आयएएस अधिकारी श्री. दिपांकर सिन्हा निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्यांचा मोबाईल क्र. 9423962831 व 9309942815 असून सी.एस.टी.पी.एस. चंद्रपूर येथील हिराई व्हीआयपी गेस्टहाऊस मध्ये त्यांचे वास्तव्य राहणार आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकी संदर्भात निवडणूक निरीक्षक यांना तक्रारी निवेदन द्यायचे असल्यास सायंकाळी 4.30 ते 6.00 या वेळात देता येणार आहे. उद्या दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत.
निवडणुक आयोगाच्या विविध निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी कामकाजाचा आढावा घेतानाच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी निरीक्षकांचा प्रयत्न राहणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक एम.के. बिजू यापूर्वीच दाखल झाले असून त्यांनी येताक्षणीच जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला आहे. निवडणुक यंत्रणा सुलभतेने राबविता यावी, मतदारांना अतिशय सहजतेने आपला मताधिकार बजावता यावा. तसेच आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी चोख आणि प्रभावीपणे करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक निवडणूक आयोगातर्फे केली जाते. नागरिकांना निरीक्षकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीविषयी अडचणी प्रशासनाकडे मांडता येतील.


