सरकारी दवाखान्यातील कामगारांच्या संपाचा दुसरा दिवस
पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा नियोजित दौरा बदलला
चंद्रपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यांपासून पगार झालेले नाही. कामगारांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.याबाबत मंत्रालय स्तरावर तसेच जिल्हा प्रशासन, कामगार विभाग, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन यांच्याकडे लेखी तसेच प्रत्यक्ष भेटून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळाला नाही. त्यामुळे जन विकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांनी काल दिनांक 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान आंदोलनामध्ये संपूर्ण 400 कामगारांनी सहभाग घेतल्यामुळे दवाखान्यातील व्यवस्था खोळंबल्याचे चित्र दिसत होते. दवाखान्यात जागोजागी वेगवेगळ्या वार्ड समोर कचरा जमा झालेला दिसत होता. कंत्राटी कामगार किमान वेतन मिळत नसतानाही अत्यंत कमी पगारामध्ये कष्ट करतात आणि दवाखान्यांमध्ये रुग्णसेवा करतात. परंतु शासनांला वेतन द्यायला निधी नाही.दुसरीकडे मात्र सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यामध्ये शासनाने तत्परता दाखवली. हा कंत्राटी कामगारांच्या वर अन्याय असल्याची भावना जनक विकास चे पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच किमान वेतन व चार महिन्यांचा थकित पगार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले.
आज दिनांक 3 मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार हे सामान्य रुग्णालय मध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या नवीन मशीन चे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. परंतु कामगार संपावर असल्यामुळे पालकमंत्र्यांनी आपला उद्घाटन कार्यक्रमाचे स्थळ बदलले. अतिदक्षता विभाग व नविन मशीन सरकारी दवाखान्यात असताना त्याचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आंदोलनकर्त्या महिला पुरुष कामगारांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पालकमंत्र्यांची वाट बघितली. मात्र पालकमंत्री दवाखान्याकडे फिरकले नाहीत. त्यानंतर हा कार्यक्रम मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित केल्याची माहिती मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सहा वाजता धरणे आंदोलन बंद केले. पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देशमुख यांनी दिला.