6 व्या वर्गासाठी 90 जागांवर मिळणार प्रवेश
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशाला यावर्षी सुरुवात होणार आहे. सैनिक स्कूल सोसायटीच्यावतीने जारी करण्यात आलेल्या प्रवेश आराखड्यानुसार 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना 21 एप्रिल रोजी परीक्षेसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर सैनिक स्कूलच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिवकुंड येथे सैनिकी शाळा सुरू होणार असून यासाठी विद्यार्थ्यांची पहिली तुकडी निवडण्याची प्रक्रिया सैनिक स्कूल सोसायटीने सुरू केली आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये रविवार 21 एप्रिल 2019 रोजी परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 हे दोन्ही दिवस धरून यादरम्यान जन्मलेल्या मुलांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे. चंद्रपूर येथील 90 जागा या मुलांसाठीच असल्यामुळे यासाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न असणारी लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी अशी निवड पद्धत या प्रवेशासाठी अवलंबण्यात येणार आहे. चंद्रपूर सैनिकी शाळेसाठी 90 जागा असून यामध्ये 15 टक्के जागा या अनुसूचित जातींसाठी 7.5 टक्के जागा अनूसुचित जमातीसाठी राखीव आहेत. उरलेल्या जागांपैकी 67 टक्के जागा या महाराष्ट्रातील मुलांसाठी तर त्यात 33 टक्के जागा इतर राज्य केंद्रशासित प्रदेशातील मुलांसाठी राखीव राहतील. महाराष्ट्र व इतर राज्यातील राखीव जागांमधील 25 टक्के जागा या आजी व माजी सैनिकांच्या मुलांसाठी राखीव आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी सामान्य व संरक्षण दलातील वर्गवारीतील उमेदवारांना चारशे रुपये शुल्क आकारण्यात आले असून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे पन्नास रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले आहे. अर्ज ऑनलाईनच करायचा असून सैनीकस्कूलअॅडमीशन डॉट इन या बेव साईटवर अर्ज भरता येणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र हॉल तिकीट हे त्याच वेबसाईटवर दिनांक 4 एप्रिल 2019 पासून उपलब्ध होणार आहे. उमेदवाराने ते हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे.
महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या संदर्भातील प्रवेश प्रक्रिया पार पडली जाणार असून चंद्रपूर येथे देखील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र असणार आहे.