"कारखाना सुरू न झाल्यास, वैनगंगा नदीमध्ये शिवसेना घेणार जलसमाधी
नागपूर येथे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई साहेब यांना शिवसेनेच्या वतीने दिले निवेदन
तुमसर (भंडारा) /प्रतिनिधी:
तालुक्यातील माडगी येथे युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून बंद पडलेला आहे. सुमारे १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. माडगी शिवारातील सुपिक जमीनी शेतकऱ्यांना कारखान्याला दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना आहे. अभय योजनेंतर्गत कारखान्याला अभय देण्यात आले होते, परंतु कारखाना सुरु झाला नाही. मागील ३५ वर्षापासून हा कारखाना सुरु होता. १८ ऑगस्ट, २००६ पासून हा कारखाना कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे विज बिल थकित होते.
यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला विजपुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात विजपुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. विज वितरण कंपनीने सवलतीच्या दरात विजपुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरवातीला ५० कोटि होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटि पर्यंत गेली होती.
दरम्यान कारखानदाराने १८ ऑगस्ट, २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला होता. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली. दरम्यान कारखाना सुरु राहावा याकरिता शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यास यश मिळाले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली होती.
राज्य शासनाने अजारी कारखान्याकरीता अभय योजना सुरु केली. युनिव्हर्सल (खंबाटा) फेरोने सन २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील विज बिल निम्मा माफ करण्यात आले होते. कारखानदाराने २०० कोटि पैकी ४८ कोटि भरले होते. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्याकरिता तिन वर्षाची वेळ देण्यात आली.
सन २०१७ मध्ये तिन वर्षे लोटले तरी कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कराराचा येथे कारखानदाराने भंग केला आहे. कारखानदाराने कारखाना परिसरातील कोट्यवधी रुपयांचा माँग्निजचा साठा किमी करणे सुरु केले होते. ते आताही सुरूच आहे.
कारखान्याकडे ३०० एकर सुपिक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांचे त्या जमीनी परत करावे. वैनगंगा नदी किनारा व मुंबई हावडा रेल्वे मार्गावर हा कारखाना आहे.
सदर दोन वर्षापूर्वी दि. ०१ जून, २०१६ ला शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण कारखाना सुरु करण्याकरिता भर उन्हामध्ये मोठे आंदोलन केले होते, परंतु प्लांट मालकाने कारखाना सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही. कारखाना सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्यात येईल असे शिवसेना तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी शासनाला इशारा निवेदन देतांना दिलेला आहे.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई साहेब यांना रेडीशन हॉटेल नागपूर येथे दि. ९ फेब्रुवारी रोजी निवेदन देतांना भंडारा जिल्हा शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शहर प्रमुख नितीन सेलोकर, माजी तालुका प्रमुख नरेश उचिबघले, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, वामनराव पडोळे, सुरेश राहांगडाले सह पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.