डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली मेट्रो कार्याची पाहणी
नागपूर- लवकरच महा मेट्रो नागपूरची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी युद्ध स्तरावर तयारी सुरु आहे. असे असताना आज दुसरीकडे (दिनांक १३ फेब्रुवारी) महा मेट्रो नागपूरच्या रिच-१ म्हणजेच वर्धा मार्गवरील एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोचे सेफ्टी रन करण्यात आले. आरडीएसओ (संशोधन डिझाइन आणि मानक संघटना) परीक्षणापुर्वी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाशी संबंधित ट्रॅक, ओव्हर हेड ओएचई, मेट्रो स्टेशन्स आणि इतर महत्वाच्या घटकांची चाचणी करण्याकरता आज हे सेफ्टी रन आयोजित करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी स्वतः उपस्थित राहून या सर्व ठिकाणची पाहणी केली. यावेळी संचालक(प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक(रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूर, कार्यकारी संचालक(रोलिंग स्टॉक) श्री. जनक कुमार गर्ग, महाव्यवस्थापक(प्रशासन) श्री. अनिल कोकाटे आणि महा मेट्रोचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरडीएसओ'चे पथक दिनांक १६ फेब्रुवारी रोजी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाची पाहणी करेल. उल्लेखनीय म्हणजे चीन येथून आलेल्या नागपूर मेट्रो कोचेसने प्रवास करून आरडीएसओ हे परीक्षण करेल. यात ब्रेक सिस्टीम, निर्वासन प्रणाली आणि इतर सर्व उपकरणांची तपासणी करण्यात येईल. निर्धारित वेळेत प्रकल्पाचे कार्य पूर्ण करण्यासाठी १२,००० अधिकारी/कर्मचारी दिवस रात्र कार्य करीत आहेत. यापैकी ४५० ते ५०० अधिकारी/कर्मचारी सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे कार्यरत आहे. कुशल कारागिरांच्या साह्याने अल्पकालावधीत एयरपोर्ट मेट्रो स्टेशनवरचे कार्य पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कार्य येत्या ३-४ दिवसात पूर्ण करणार असल्याचे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.