मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
नागपूर -
"मुख्यमंत्री सौर कृषी पंप" योजनेत विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून योजना सुरु झाल्यापासून आज पर्यंत १० हजार ५०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर आवश्यक पैसे जमा केले आहेत.
पूर्ण राज्यात मार्च- २०१९ पर्यंत ५० हजार सौर कृषी पंप लावण्याचे महावितरणचे नियोजन आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ९५७ शेतकरी बांधवानी महावितरणकडे "मुख्यमंत्री सौर कृषी पंप" योजनेत अर्ज केले आहेत. विदर्भात सर्वाधिक अर्ज वाशीम जिल्ह्यातून आले आहेत. येथे २५१६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.यातील ४१० शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर२० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले आहेत. नागपूर जिल्ह्यात ८०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून यातील २६२ जणांना मागणीपत्र दिल्या गेले आहे. यातील ५४ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. येथून १०५८ अर्ज आले आहेत. भंडारा जिल्ह्यातून ८८९ अर्ज आले असून २४४ जणांना मागणी पत्र महावितरणकडून देण्यात आले आहे.
"मुख्यमंत्री सौर कृषी पंप" योजनेत शेतकऱ्यांना ३ आणि ५ अश्व शक्तीचे सौर कृषी पंप वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी खुल्या प्र - वर्गातील शेतकऱ्यांना ३ अश्वशक्तीसाठी २५,५०० रुपये तर ५ अश्वशक्तीसाठी ३८,५०० रुपये एवढी रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्याला अर्धी म्हणजे १२,७५० रुपये आणि १९,२५० रुपये भरावे लागणार आहेत. शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्याप्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता समाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. "मुख्यमंत्री सौर कृषी पंप" योजनेत काही शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक चुकांमुळे बाद झाले आहेत. तरी शेतकरी बांधवानी अर्ज भरतेवेळी पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.