काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्र पोलीस विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशुतोष खेमनार यांनी शनिवारच्या बैठकीत पोलीस विभागाला दिले आहेत.
या वर्षात लोकसभा निवडणूक होणार असून, कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चित्रे आहेत. निवडणूक काळात शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्र शासनजमा केले जाते. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शनिवारी सकाळी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व जिल्हा निवडणूक आधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना याबाबतचे आदेश दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी खेमनार यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक बोलावली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी भूगांगवकर, जिल्हा विशेष शाखेचे महेश कोंडावारसह अन्य पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना नोटीस देऊन शस्त्र पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात ५४२ शस्त्र परवानाधारक आहेत. यात बंदुकीसह अन्य शस्त्रांचा समावेश आहे.