2 व 3 मार्च रोजी युवकांना मतदार बनण्याची संधी
चौकशीसाठी जिल्ह्यामध्ये 1950 टोल फ्री क्रमांक उपलब्ध
नियोजन भवनात विशेष माहिती कक्षाचे गठण
चंद्रपूर दि 26 फेबुवारी : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने आगामी लोकसभा निवडणुकांना लक्षात घेता मतदारांना सुविधा व्हावी. यासाठी जिल्हा नियोजन भवनांमध्ये 1950 या हेल्पलाइनचे कक्ष सुरू केले आहे. मतदारांना यावर माहिती दिली जाणार आहे. हा टोल फ्री क्रमांक असून मोबाईल लँडलाईन व कुठल्याही संपर्क व्यवस्थेवरून संपर्क साधता येतो. तसेच शनिवार व रविवार या दोन सुट्टीच्या दिवसात प्रशासकीय यंत्रणेने नवीन मतदार नोंदणीचा उपक्रम राबविला. त्यामध्ये जवळपास सात हजार नवमतदारांची नोंदणी केली आहे. 2 व 3 मार्चला पुन्हा एक संधी नवमतदारांना उपलब्ध केली जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात 23 व 24 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सात हजारांवर नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. तर नाव वगळणे, नाव दुसऱ्या मतदार स्थानांतरण करणे, नावात सुधारण आदी प्रक्रियेचे अर्ज अनेक भरून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर व वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार म्हणून नोंदणी नसलेल्या अशा नागरिकांना मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध व्हावी, म्हणून शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिम राबविण्यात आली.
ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले अशा नवमतदारांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सर्वच केंद्रांवर 7 हजार 338 नवमतदारांची नोंदणी करण्यात यश आले. तर नाव वगळणे नमुना 7 चे अर्ज 364 जणांनी भरून दिले, नावात सुधारणा नमुना 8 चे अर्ज 1290 आणि नावे स्थानांतरण नमुना 8-अ चे अर्ज 135 जणांनी भरून देत या मोहिमेचा लाभ घेतला आहे.
पुढील आठवड्यात शनिवार दोन मार्च व रविवार तीन मार्च रोजी सुद्धा ही संधी उपलब्ध राहणार असून नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले आहे. लोकसभा निवडणूका कधीही लागू शकतात. भारतीय निवडणूक आयोगाकडून त्यासंदर्भातली घोषणा होऊ शकते त्यापूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही किंवा ज्यांनी अठरा वर्षे पूर्ण केले आहेत त्यांनी आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सतर्कतेने या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी 19 50 या हेल्पलाईनचा वापर करून संपर्क साधावा असेही या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे सर्व कंपन्यांच्या मोबाईलवरून देखील हा क्रमांक सहजपणे लागतो यासंदर्भात अडचण असल्यास जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये नव्याने उघडण्यात आलेल्या कक्षामध्ये देखील याबाबत मदत केल्या जाऊ शकते,असेही स्पष्ट करण्यात आले आहे या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.