नागपूर/प्रतिनिधी:
गृह मंत्रालय, भारत सरकार व युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केन संगठन, व नेहरू युवा केंद्र नागपूर व्दारा उत्तर पुर्व युवा आदान प्रदान कार्यक्रम नागपुरात 16 फेब्रुवारी, 2019 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान दररोज पुर्वोत्तर राज्यातील जवळपास 275 युवक युवतींसाठी बौध्दिक व चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादींचे आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.14 फेब्रुवारी रोजी शिबीरातील सहभागी युवक-युवतींनी नागपूर भ्रमण करुन नागपूरचा इतिहास व संस्कृतिची माहिती जाणून घेतली.
सुरुवातीला राजभवन येथे जावून त्यांनी राज्यपालांचे निवासस्थान, आयुर्वेदिक वनौषधी व राजभवनातील विशेष बगीच्यातील फुलझाडांची माहिती घेतली. मानवी शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी वनऔषधि उपयुक्त आहे तसेच विविध रोगांवर मात करण्याचे सामर्थ आपल्या भारतीय वनऔषधिमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर दिक्षाभूमीचे दर्शन घेवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्राविषयीची माहिती घेतली. तसेच ऐतिहासीक बौधीवृक्ष, भिक्क्षू निवास स्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आदिना भेट दिली. जगात शांतता प्रस्तापित करण्यासाठी पंचशील तत्वाचे पालन महत्वाचे आहे अशा भावना शिबीरार्थीनी व्यक्त केल्या.
त्यानंतर कामटी तालुक्यातील गादा गावाला भेट देवून महाराष्ट्रातील ग्रामीण जनजीवनाची व युवा मंडळाच्या कार्याची माहिती घेतली. गादा गावातील लोकांसोबतच्या सहभोजन व आदिरातिथ्याने शिबीरार्थी भारावून गेले.
ऐतिहासीक ड्रगनपॅलेस व नागलोक या स्थळांना भेट देवून जपान च्या सहकार्याने तयार केलेल्या भगवान गौतम बौध्दांच्या मुर्तीचे दर्शन शिबीरार्थींनी घेतले.
त्यानंतर प्रसिध्द स्वामी नारायण मंदीराला भेट दिली. तेथील कोरीवमुर्ती, नक्षीकाम, सुंदर कारंजे व नयनरम्य त्याचप्रमाणे नेत्रदिपक दिव्यांच्या रोषनाईची पाहणी त्यांनी केली. स्वामीनारायण मंदीरातील शिस्त, शांतता व स्वच्छतेचे विशेष कौतुक शिबीरार्थीनी केले.
नेहरू युवा केन्द्राचे राज्य निदेशक, मा. श्री. दिनेश राय यांच्या मार्गदर्शनात आयोजित नागपूर या ऐतिहासिक शहराची भेट उत्तर पुर्व युवा आदान प्रदान कार्यक्रमातील शिबीरार्थींसाठी अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा युवा समन्वयक श्री. शरद साळुंके, श्री.हितेंन्द्र वैद्य, सौ.ज्योती मोहिते, लेखापाल संजय राऊत, अखिलेश मिश्रा, अनिल ढेंगे, रमेश अहिरकर, अनिल साखरे, कार्यक्रम समन्वयक श्री. देवेंद्र कुमार, श्री.पवन कुमार, श्री., मंगेश डुबे, देवेंद्र इखार, संध्या जुननकर, तसेच सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले