चंद्रपूर/प्रतिनिधी:-
सुर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक चंद्रपूर तर्फे रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ ला सकाळी ११ वाजता बल्लारपूर येथील संवेदनशील कवयित्री अर्जुमन शेख यांच्या सांजरंगी सावल्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन आणि नंतर जिल्ह्यातल्या कवींचे कविसंमेलन स्थानिक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
ऊर्मी मासिकाचे संपादक आणि राज्यभरातून ही चळवळ रुजवणारे ज्येष्ठ कवी आणि संपादक प्रा. जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत, ज्येष्ठ कवी ना गो थुटे यांचे हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. देऊळगावराजा येथील प्राचार्य डॉ गजानन जाधव आणि चंद्रपूरच्या काव्यरसिक व प्रबोधनकार चैताली खटी या कवितासंग्रहावर भाष्य करतील. काव्यसंग्रह प्रकाशनानंतर जिल्ह्यातील कवींचे कविसंमेलन वर्धा येथील शेतकरी कवी संदीप धावडे यांच्या अध्यक्षतेत होणार असून कवी सुनील बावणे या कविसंमेलनाचे संचालन करतील.
सहभागी होणाऱ्या सर्व कवींना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. तरी काव्यरसिकांनी, कवींनी, सुर्यांशप्रेमींनी प्रकाशन सोहळ्याला आणि कविसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.