नागपूर/प्रतिनिधी:
पाणी, वीज, गडर लाईन, अतिक्रमण, स्वच्छता, नाल्याच्या समस्यांबाबत नागरिकांना दररोजच त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
लिंक वर क्लिक करा आणि खबरबात एप डाऊनलोड करा
लक्ष्मीनगर झोनमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रमात सोमवारी (ता.११) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. विकास नगर येथील गंगाधरराव फडणवीस क्रीडा संकुल परिसरात आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनली कडू, पल्लवी श्यामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, लक्ष्मी यादव, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरवार, किशोर वानखेडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व विविध शासकीय कार्यालय, तसेच ओसीडब्ल्यू, एसएनडीएलचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मीनगर झोनमधील सुमारे ५० तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निपटारा केला. सोनेगाव येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील सोसायटीमध्ये कुत्रे व डुकरांचा त्रास होत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. संपूर्ण शहरात ही समस्या असून डुक्कर पकडणे व कुत्र्यांच्या नसबंदीसंबंधी कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्वरित यासंबंधी कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सफाई कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा टाळण्यासाठी परिसरातील सोसायटीमध्ये मनपाच्या रजिस्टरवर त्यांची दररोज नियमित हजेरी घेण्यात यावी व त्यानुसारच सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.
दीक्षाभूमीच्या मुख्य द्वारापुढे महापुरूषांची पुस्तके व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांना स्थायी स्वरूपाची जागा देण्याची मागणी संबंधित दुकानदारांनी केली. दीक्षाभूमी विकासाचा १०० कोटींचा प्लान तयार करण्यात येत असून यामध्ये विक्रेत्यांना जागा देण्याच्या कार्यवाहीसंबंधी १८ डिसेंबरला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
झोनमध्ये विविध भागात अतिक्रमण करून झोपडपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. इथे गडरलाईन, सिवर लाईन नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. अतिक्रमण स्थळावर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वे करावा आणि त्याचा अहवाल सादर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले. अजनी येथे मालकी हक्क पट्टे देण्याबाबतच्या मागणीबाबतही येत्या सात दिवसात कुणाच्या मालकीतील आहे. यासंबंधी आवश्यक ती तपासणी करून अहवाल सादर करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.
अतिक्रमणामुळे परसोडी क्षेत्रातील रस्ता अरुंद झाला असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून रस्ता मोकळा करण्याबाबत येत्या १५ दिवसात कार्यवाही करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले. याशिवाय परिसरात विद्युत व्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करणे व रस्त्याच्या बांधकामासंबंधी १५ दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अडथळे दूर करून कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
खामला मार्गावरही दुकानदारांनी फुटपाथवर शेड व ओटे तयार केले आहेत. अशा ठिकाणी एकदा कारवाई केल्यानंतरही पुन्हा तीच समस्या उद्भवते. अशात झोनस्तरावर अतिक्रमण पथक तयार करून कठोर पवित्रा घेत कायमची जप्ती करण्याची नियमित कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय रस्त्यावर भरणाऱ्या बाजी बाजारांवरही या पथकामार्फत कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
रहिवासी क्षेत्रातील नाल्यामध्ये घरातील सांडपाणी सोडल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. नाल्याचे योग्य बांधकाम करून गडर लाईनसाठी योग्य व्यवस्था यासंबंधी सर्वे करणे, डिझाईन तयार करून त्यासंबंधी आवश्यक माहिती लवकरात लवकर सादर करण्यात यावी. राज्य शासनाकडून निधी देऊन हे काम तातडीने करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगतिले.
परफेक्ट सोसायटीमध्ये पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या तक्रारीवर दखल घेत ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्वरीत कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. लक्ष्मीनगर परिसरात अनेक वर्षांपासून बंदावस्थेतील वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. यासंबंधी वाहतूक पोलिस विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले.
याशिवाय शहरातील विद्युत व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्वरित विद्युत दिवे लावणे, सिवर लाईन, ग्रीन जिम याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जनसंवादमध्ये निर्णय न होऊ शकलेल्या समस्यांबाबत संबंधित विभागांसोबत बैठक बोलावून लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचेही आश्वासनही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.