Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१९

राजधानीत ‘छत्रपती शिवाजी महोत्सव’


नाटक, संगीत व अन्य कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली, 12 : श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्यावतीने 15 ते 19 फेब्रुवारी 2019 दरम्यान राजधानी दिल्लीत‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात वैविद्यपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहेत.

येथील कॉन्स्टिटयुशन क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे महासचिव निवृत्त कर्नल मोहन काकतीकर यांनी आज ही माहिती दिली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर’ व्याख्यान होणार आहे.

प्रसिध्द नाटक ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ चे सादरीकरण

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व आतापर्यंत 700 हून जास्त प्रयोग झालेले ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायं.6.30 वा. सादर होणार आहे. विद्रोही शाहीरी जलसा व रंगमाळा यांचे सादरीकरण असणा-या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांचे आहे. नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे तर दिग्दर्शक नंदू माधव आहेत.

याच दिवशी जागतिक किर्तीचे कलाकार एस.बी.पोलाजी व कलाकारांचा समूह यांनी रेखाटलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत’ रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सायंकाळी 5 वाजतापासून कॉन्स्टीटयुशन क्लब येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सकाळी 10 वाजता येथील राजौरी गार्डन परिसरातील शिवाजी महाविद्यालयात ‘आधुनिक भारतात शिवाजी महाराजांचे मूल्य व वारसा यांचे महत्व’ या विषयावर आंतर महाविद्यालयीन वाद -विवाद स्पर्धा होणार आहे.

‘शिव कल्याण राजा’ संगीतमय कार्यक्रम

स्वरभारती प्रस्तुत ‘शिव कल्याण राजा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन 17 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजता होणार आहे. प्रसिध्द गायक व संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व अन्य कलाकार संगीतमय प्रस्तुती देतील तर विद्यावचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयाला आदरांजलीने महोत्सवाची सांगता

येथील मिंटो रोड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिनी 19 फेब्रुवारी 2019 रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष मोतीलाल व्होरा आणि उत्तर दिल्ली महानगर पालिकेचे महापौर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पार्पण करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महोत्सवातील सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गवरील मावळणकर सभागृहात होणार असल्याची माहिती श्री. काकतीकर यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.