मुंबई/प्रतिनिधी:
देशातील सर्वच राज्यातील शासकीय तसेच खासगी वीज वितरण, निर्मिती व पारेषण कंपन्यांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कोषाध्यक्षपदी महावितरणच्या मुंबई येथील सांघिक कार्यालयातील औद्योगिक संबंध विभागात कार्यरत उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललित किसन गायकवाड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
देशभरातील विद्युत क्षेत्रातील विविध 35 राज्य विद्युत मंडळे व खासगी कंपन्यांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या क्रीडा मंडळामार्फत दरवर्षी देशभरातील विविध ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अशा या प्रमुख क्रीडा मंडळावर कलकत्ता येथे नुकत्याच आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या सर्वसाधारण सभेत श्री. ललित गायकवाड यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरावरुन अभिनंदन होत आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार, मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक श्री चंद्रशेखर येरमे यांनी श्री गायकवाड यांचे कौतूक केले असून ही कपंनीसाठी गौरवाची बाब आहे, असे म्हटले आहे. यापुर्वी श्री. ललित गायकवाड 2017 पासून अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळावर सहसचिवपदी कार्यरत होते.