नागपूर,२१ फेब्रुवारी २०१९ :डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि. तर्फे ‘डीएसपी निफ्टी ५० इंडेक्स फंड’ आणि ‘डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड’ हे नवीन मुदतमुक्त इंडेक्स फंड प्रस्तुत करण्यात आले आहेत. याद्वारे, अनुक्रमे निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्स्ट ५० या निर्देशांकावर बेतलेल्या गुंतवणूक कामगिरीचा लाभ गुंतवणूकदारांना दिला जाणार आहे.
अल्पखर्चात समभाग संलग्न गुंतवणुकीत प्रवेश करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त आहे. समभाग गुंतवणुकीत विविधांगी स्वरूपात प्रवेश करून इच्छिणाºया तसेच सराईत गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलियोला ठोस वळण देण्याच्या दृष्टीने हे फंड लाभदायी ठरतील. गौरी सेकारिया यांच्याकडून ‘डीएसपी निफ्टी ५० इंडेक्स फंड’ आणि ‘डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड’ या दोन्ही योजनांचे निधी व्यवस्थापन पाहिले जाईल.
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे अध्यक्ष कल्पेन पारेख यांच्या मते, भारतात इंडेक्स फंडांसारख्या निष्क्रिय गुंतवणूक व्यवस्थापन असलेल्या फंडांमध्ये २००८ मध्ये सुमारे ९,००० कोटी रुपये गुंतवणूक होती. ती आता अनेक पटींनी वाढून ऑगस्ट २०१८ मध्ये एक लाख कोटी रुपयांच्याही पुढे गेली आहे. गुंतवणूकदारांचा आता सक्रिय आणि निष्क्रिय निधी व्यवस्थापन पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच बनला असल्याचे हे द्योतक आहे. निष्क्रिय निधी व्यवस्थापनातूनही गुंतवणूकदार चांगला फायदा कमावू शकतात व अत्यंत परिणामकारक पद्धतीने आपली आर्थिक ध्येये गाठू शकतात, अशी त्यांनी पुस्ती जोडली.
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सच्या निष्क्रिय गुंतवणूक व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अनिल घेलानी हे असून, भारतातील निष्क्रिय गुंतवणूक क्षेत्रात डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सच्या संघाने तगड्या ज्ञानासह समृद्ध अनुभव विकसित केला असल्याचे सांगितले. स्थानिक बाजारपेठेसह या संघाने, सर्वोत्तम जागतिक पद्धतीवर आधारीत उत्पादन विकास आणि निधी व्यवस्थापनातही उमदे ज्ञान कमावले आहे.