ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर/प्रतीनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना शेतीमध्ये सिचंनाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून 13 प्रकारचे शेततळे तयार करण्याकरीता शासनाकडून 50 हजार रुपये इतके अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडून माहिती करुन घेण्यात यावी. यामध्ये ज्या शेतक-यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन व त्यापेक्षा अधिक जमिन असलेले शेतकरी सुध्दा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत. परंतु यापूर्वी ज्या शेतक-यांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेमधून लाभ घेतलेला नसावा.
या योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील शेतकरी अथवा ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असेल त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत घेऊन प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल. या व्यतिरीक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणा-या शेतक-यांची जेष्ठता यादी तयार करण्यात येवून त्यानुसार सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेततळयाच्या आकारमानांनुसार देय होणारी अनुदानाची कमाल रक्कम 50 हजार इतकी असून यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधीत लाभार्थ्यांला स्वत: भरावी लागणार आहे.
सदर शेततळयासाठी http://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. या योजनेच्या इतर माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन मोठया संख्येने शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी आहे.