राज्याच्या अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्हयाचेही उल्लेखनीय प्रतिनिधीत्व
झटपट व इरई नदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद
राजुरा विमानतळाला प्राधान्य देण्याचा संकल्प
बीआरटीसी व चांदा ते बांदा योजनेचाही उल्लेख
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाला सादर करताना राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृह जिल्हा चंद्रपूरकडे विशेष लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील झरपट आणि इरई नदीच्या विकासासाठी विशेष तरतूद केली असून राजुरा जवळ उभ्या राहणाऱ्या विमानतळाला गती मिळण्याचे संकेत आजच्या अर्थसंकल्पातील तरतुदीने दिले आहे.
आज सन 2019-20 चा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत त्यांनी सादर केला. राज्य शासनाच्या विविध योजनांना आर्थिक बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काही प्रकल्पाचा उल्लेख देखील त्यांनी केला . अंतरिम अर्थसंकल्पात पर्यावरण प्रदूषित नद्यांच्या संवर्धनाचा विषय त्यांनी मांडला. यासाठी आर्थिक तरतूद करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील चंद्रभागा नदी सोबतच त्यांनी यावेळी चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या झरपट आणि इरई नदी यांच्या संवर्धनासाठी देखील तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रदेशाची व्याप्ती आणि व्यापार, उद्योग व अन्य सुविधांसाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विमान सेवेची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. महाराष्ट्रातील अमरावती, गोंदिया ,नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर,कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विमानतळांच्या सोबतच चंद्रपूर येथील विमानतळ देखील विकसित केले जाईल असे संकेत यांनी या अर्थसंकल्पात दिले . त्यामुळे राजुरा येथील प्रस्तावित विमानतळाला गती मिळेल असे संकेत आहेत.
वडसा, देसाईगंज रेल्वे प्रकल्प संदर्भातही त्यांनी या अर्थसंकल्पात मदत करण्याचा उल्लेख केला. तसेच जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील व केशरी कार्ड असणाऱ्यांना देखील दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य मिळावे, यासाठी नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी आर्थिक तरतूदही त्यांनी केली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादकांकडे विशेष लक्ष वेधताना त्यांनी राज्यातील दूध, कांदा, हरभरा, यासोबतच धान उत्पादकांना देखील अनुदान देण्याचे सांगितले. आपल्या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकासावर भर देत असताना त्यांनी चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेल्या कौशल्य विकासाचा उल्लेख केला. यासोबतच त्यांनी राज्याच्या विकासात मागे राहिलेल्या प्रदेशांसाठी तयार करण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या फलनिष्पत्तीचा देखील उल्लेख केला. या योजनेतून भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. तसेच बांबू या उत्पादनाकडे भविष्यामध्ये ऊसाप्रमाणे प्रमाणे लक्ष देण्याच्या त्यांच्या संकल्पनेचे प्रतिबिंब बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सन्मानजनक उल्लेखातून दिसून आला.