सात दिवसात पोर्टलवर विदर्भातील १६० शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:संग्रहित |
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ घेत मागील सात दिवसात विदर्भातील १६० शेतकऱ्यांसह राज्यातील सुमारे ७२४ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.यात नागपूर जिल्ह्यातील ११ तर वर्धा जिल्ह्यातील ७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते नुकतेच सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे झाले आहे. तसेच या पोर्टलवर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, याशिवाय मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच या पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेता येईल. या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.