Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ३१, २०१९

चंद्रपूर महापौर चषकाचा थरार आजपासून

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने दि. १ फेब्रूवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान महापौर चषक कबड्डी व कुस्ती स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कारागृहामागील कोहिनूर क्रीडांगण येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन १ फेब्रूवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रूवारी सायंकाळी ६ वाजता मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहीर यांच्या हस्ते व मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील खेळाडूंसाठी मान्यताप्राप्त संघटनांमार्फत विविध क्रीडा प्रकारांमध्ये महापौर चषक स्पर्धा आयोजित केल्या जातो. शहरातील विविध खेळाडूंना आपल्या क्रीडाकौशल्य गुणांना वाव देता यावा तसेच खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुला-मुलींनी शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवावे हा त्यामागील उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना व संघांना पैशांच्या स्वरुपात धनादेशाव्दारे बक्षिसे अदा केली जातात. यामुळे खेळाडूंना आर्थिक मदत होते 

या स्पर्धेत राज्यभरातून पुरूष व महिला कबड्डी - कुस्ती संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धेत पुरुष विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ८१,०००/- व ६१,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ६१,०००/- व ४१,०००/- रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द टूर्नामेंट रुपये ११,१११/-, मॅन ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळाडू रुपये ७,०००/-, उत्कृष्ट खेळाडू रुपये ५,०००/-, आवडता खेळाडू रुपये ५,००० या स्वरूपाची वैयक्तीक रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. तर कुस्ती स्पर्धेत रुपये ७१,०००/- व ३५,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे रुपये ५१,०००/- व ३१,०००/- रोख पारितोषिक व गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.. कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. ३ फेब्रुवारी रोजी तर कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. १० फेब्रुवारी रोजी मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहीर यांच्या हस्ते तसेच मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, श्री. देवरावजी भोंगळे जि. प. अध्यक्ष, मा. चंदनसिंह चंदेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 

कुस्ती व कबड्डी स्पर्धेकरिता राज्यस्तराहून पंचांना आमंत्रित करण्यात आले असून खेळाडूंची भोजन व्यवस्था सोमेश्वर मंदिर येथे तर निवास व्यवस्था खालसा कॉन्व्हेंट पटेल हायस्कूल, लोकमान्य टिळक काळाराम मंदिर मनपा प्रा. शाळा, जाकीर हुसेन शाळा दादमहाल वॉर्ड, सन्मित्र कॉन्व्हेंट समाधी वॉर्ड, काळाराम मंदिर, येथे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यास सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असून महानगरपालिकेच्या महापौर सौ. अंजली घोटेकर व आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी, कर्मचारी, समिती सदस्य कार्यरत आहेत. १ फेब्रूवारीपासून सुरु होणाऱ्या महापौर चषक कुस्ती व कबड्डी स्पर्धेचा आस्वाद सर्व चंद्रपूरकरांनी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.