मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन
वीजजोडणीसाठी २ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी. आदिवासी भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने वीजजोडणी द्यावी. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री, जिल्हापरिषद अध्यक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधींशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे निर्देश ऊर्जामंत्री . चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिले.
यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. ही मार्गदर्शन पुस्तिका शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला.
या प्रकाशन समारंभात प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व्हिडीओ कॉन्फेरेसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. याप्रसंगी संजीव कुमार यांनी योजनेच्या यशस्वीतेसाठी व शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात मदत करण्यासाठी स्थानिक कार्यालयात एका पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्व मुख्य अभियंत्यांना दिले.
शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेबाबतची संपूर्ण माहिती, पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची पध्दत, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची माहिती, कृषिपंप लावण्यासाठी जागेच्या निवडीबाबतची माहिती, सौर कृषीपंप लावण्याचे फायदे तसेच त्यासाठी अर्जदाराने भरावयाची रक्कम इत्यादि महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मनात आलेल्या विविध शंकांचे निरसन माहिती पुस्तिकेद्वारे करण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी महावितरणतर्फे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २३ जानेवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २ हजार १९० शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.