Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १३, २०१९

कृषी प्रदर्शनीत बचत गटांची पहिल्याच दिवशी अडीच लाखांची विक्री

  विविध विभागाचे मॉडेल विद्यार्थ्यांसाठी ठरताहेत आकर्षण
 चंद्रपूर/प्रतिनिधी:

  शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनीमध्ये घालवावा. याठिकाणी बचत गटांच्या वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकऱ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा डॉ.उदय पाटील यांनी संयुक्तरित्या आज जारी केलेल्या पत्रकामध्ये सरस महोत्सव व जिल्हा कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी चांदा क्लब मैदानावर भेट द्यावी असे आवाहन केले आहे. देश-विदेशात सुरू असणारे नवनवीन कृषी मधले प्रयोग यासोबतच त्यावरील तज्ञ वक्‍त्यांचे व्याख्यान, जिल्हाभरातील बचत गटांनी केलेल्या वेगवेगळ्या लघु उद्योगाच्या सादरीकरणाला बघण्यासाठी या ठिकाणी यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवारच्या उद्घाटनानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखविली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूह आणि उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, बचत गटांच्या महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित वस्तूंची भव्य विक्री प्रदर्शनी देखील या ठिकाणी आयोजित केली आहे. खानपानाच्या पदार्थापासून तर रोजच्या आयुष्यात वापरण्यायोग्य वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी या बचत गटांनी लावलेले आहे.

या विक्री प्रदर्शनीमध्ये स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या सुगंधित अगरबत्ती, घोंगडी व गाद्या कापडी बॅग, लोकर विणकाम, विविध प्रकारच्या मातीच्या शोभेच्या वस्तू व भांडी, लाकडी शोभेच्या वस्तू, बांबू हस्तकला विविध प्रकारचे लोणचे ,सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित वस्तू, झुणका-भाकर ते विविध शाकाहारी,मांसाहारी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. विविध नाश्त्याचे प्रकार सेंद्रीय शेतीतील आवश्यक असलेले सेंद्रिय खत, बीजामृत, जीवामृत ,द्राक्षासव पशुपालनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसह या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या पशुंचे देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या सरस विक्री प्रदर्शनीमध्ये पहिल्याच दिवशी 2 लाख 53 हजार एवढी भरघोस विक्री झाली आहे. त्यात नागभीड तालुक्यातील झेप प्रभाग संघाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू,मोठ्या प्रमाणात विक्री झाल्या आहेत. पोंभूर्णा तालुक्यातील महालक्ष्मी समूहाने मच्छी पासून तयार केलेले लोणचे,चकली पापड ,धूम करीत आहे. चिमूर तालुक्यातील शारदा स्वयंसहाय्यता समूहाने सौंदर्यप्रसाधने तयार केली आहेत. त्यांचीही भरपूर विक्री होत आहे. तसेच फुड स्टॉल वरील नही अनेक स्टॉलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.दररोज या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल समाजकल्याण विभागाच्या वेगवेगळ्या वस्तीगृहाच्या मुलांनी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. शनिवारी याठिकाणी नाटकाचे आयोजन केले आहे तर रविवारी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता पासून या ठिकाणी सर्व स्टॉल खुले करण्यात येत आहे .त्यामुळे चंद्रपूरातील सर्व स्तरातील जनतेने आपल्या परिवारास आपला रविवार या ठिकाणी घालविण्यासाठी घेऊन यावे ,असे आवाहन चंद्रकांत वाघमारे व डॉक्टर उदय पाटील यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.