Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २४, २०१८

विद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र



  • 'स्वयम'तर्फे पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा 
  • सॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी दिल्या टिप्स 

नागपूर : प्रभावी वक्तृत्वासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणकौशल्ये असावी लागतात. काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते, तर काही गुण प्रयत्न करून विकसित करावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि प्रभावी करावे, असा सल्ला सॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी विद्यार्थिनींना दिला. स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबतर्फे रविवारी (ता. २३) कमला नेहरू महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित स्टेज डेअरिंग-पब्लिक स्पीकिंग कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी नगरसेवक संजय महाकाळकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

पारुल आर्य म्हणाल्या, वक्तृत्व कला ही व्यक्तिमत्त्वाचे भूषण आहे. कोणत्याही क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर उत्तम भाषण देता येणे गरजेचे आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, अध्यात्म, प्रसारमाध्यमे यासह प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाचा पाया हा वक्तृत्व आहे. आजचा वक्ता हा उद्याचा शिक्षक, नेता, विचारवंत, वकील, समाजसुधारक बनू शकतो. आपल्या प्रभावी भाषणाने तो समाजाचे, राज्याचे, राष्ट्राचे नेतृत्व करून इतरांना कार्यप्रेरणा देऊ शकतो. प्रभावी भाषणासाठी वाचन, लेखन, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, निर्भयता, विनोदबुद्धी, विषयाचे ज्ञान, श्रोत्यांचा अंदाज घेण्याचे कसब, भाषाशैली, आवाजाचा स्तर, उच्चारातील गती आणि अभिनयक्षमता इत्यादी महत्त्चाचे गुण वक्त्याकडे आवश्यक असल्याचे आर्य यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला स्पर्धेचे बक्षीस वितरण :
या कार्यशाळेत नागपुरातील २४ शाळा/महाविद्यालयांमधील २३० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर 'स्त्रीशिक्षणाचे महत्त्व' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ३ जानेवारी २०१९ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ‘न्यू इयर - न्यू व्हिजन' कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह उत्कृष्ट देहबोली, माहितीचे विश्लेषण, आवाजाचा चढ-उतार, सादरीकरण, हावभाव, विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास अशा विविध श्रेणींनुसार प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. 

स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची कला मुलींमध्ये विकसित होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वक्षमता निर्माण व्हावी, या हेतूने 'स्वयम'चे  अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दैनंदिन व्यवहारासह विविध स्पर्धा परीक्षांतील गटचर्चा किंवा मुलाखतीमध्ये संवादकौशल्याचे महत्त्व असल्याने विविध शाळांतील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.