Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २४, २०१८

रामझुलाचे लोकार्पण जानेवारीत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : 

   ऑरेंज सिटी-मेट्रो मॉलचे भूमिपूजन जानेवारीत


नागपूर, ता. २४ : 
रामझुलाचे काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला का करण्यात आला नाही यासंदर्भात ना. नितीन गडकरी यांनी विचारणा केली असता काही किरकोळ कामे असल्याने एक महिना अजून विलंब होईल, असे उत्तर मिळाले. त्यावर जानेवारी महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले. जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकाला लागून महामेट्रो ऑरेंज सिटी-मेट्रो मॉल तयार करीत आहे. यासंदर्भात सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. रामझुलाचे लोकार्पण आणि ऑरेंज सिटी-मेट्रो मॉलचे भूमिपूजन १९ जानेवारीला घेण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

 शासकीय कागदोपत्री विविध मंजुरीसाठी अडलेले नागपुरातील सर्व ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील अडीअडचणी तातडीने दूर करा. फेब्रुवारी २०१९ पूर्वी या सर्व प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन होईल, असे उद्दिष्ट समोर ठेवून काम करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर शहरातील विविध प्रस्तावित कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी,जलस्त्रोत व गंगाशुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २४) वनामती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे,उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महामेट्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मध्य रेल्वेचे डीआरएम एम. एस. उप्पल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, सार्वजनिक बांधकाम विभाग (महामार्ग)चे अधीक्षक अभियंता श्री. ठेंग, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटीडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे एम. चंद्रशेखर उपस्थित होते.

सर्वप्रथम नामदार नितीन गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. जुना भंडारा रोड-मेयो हॉस्पीटल ते सुनील हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, तेथील भूसंपादनाची सद्यस्थिती,केळीबाग रोड रुंदीकरण आणि भूसंपादनाबाबतची सद्यस्थिती, जयस्तंभ चौक ते मानस चौक रस्त्याच्या विकासाचा प्रस्ताव, वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रस्त्याला जोडणारा डी.पी. रोड आदींमधील अडचणी तातडीने दूर करून जानेवारी महिन्यापर्यंत भूसंपादन कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले.

नागपूर शहरात विविध ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाची जी कामे रेल्वे विभागाच्या आडकाठीमुळे अडलेली आहेत त्यातील अडथळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने दूर करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी माहिती दिली. सप्टेंबर २०१९ पर्यंत जिकाकडून मिळणाऱ्या कर्ज करारावर स्वाक्षरी होऊन डिसेंबर २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


          महाल बुधवार बाजाराचे डिझाईन मंजूरनागपूर शहरातील भाजी मार्केट, बुधवार बाजार महाल, सोमवारी पेठ सक्करदरा, नेताजी मार्केट, मच्छी मार्केट आदींचाही आढावा ना. नितीन गडकरी यांनी घेतला. यावेळी महाल बुधवार बाजारचे डिझाईन ना. गडकरी यांच्यासमोर सादर करण्यात आले. या डिझाईनला त्यांनी मंजुरी देत पुढील प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सक्करदरा बुधवार बाजाराचे डिझाईन नामवंत आर्किटेक्टकडून तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.


           एनएचएआयच्या कामांना गती देण्याचे निर्देश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सुरू असलेल्या विविध कामांप्रती नाराजी व्यक्त करीत या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पारडी येथील उड्डाणपुलाचे काम बरेच रेंगाळले आहे. चार वर्षात केवळ ३० टक्के काम झाल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. भूसंपादनाच्या कार्यातील अडथळे दूर करुन या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी ना. गडकरी यांनी दिले. वाडी येथील उड्डाणपुलाच्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.