जालना,दि.17 : निसर्गाच्या अवकृपेमुळे आपणा सर्वांना भीषण पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागणार आहे. टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम या बाबींचे सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पदुम व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जालना मतदासंघाच्या पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री श्री.खोतकर बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती पांडूरंग डोंगरे, द्वारकाबाई खरात आदींची उपस्थिती होती. राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले की, जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये यंत्रणांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी. पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण न करता टंचाई परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे. टँकरद्वारे पाणी पुरवठा हा शेवटचा पर्याय असून टंचाईच्या अनुषंगाने नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी बाबींवर भर देण्यात यावे. त्याचबरोबरच 200 फुटावर पाणी लागणाऱ्या बोअरसाठी तातडीने मंजुरी देण्यात यावी. कुठल्याही पाणी पुरवठा येाजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये तसेच विहीर अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी टंचाईच्या अनुषंगाने जालना मतदासंघातील गावनिहाय पाण्याबाबत परिस्थिती उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून जाणून घेत पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही टंचाईच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेतील सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व गावचे सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.