- चंद्रपूरचा गोंङकालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करा
- पाठ्यपुस्तक मंडळ चे इको-प्रो ला पत्र
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील वैभवशाली गोंडकालीन इतिहासाचा स्थानिक पातळीवरील शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबतचे निवेदन जिल्ह्यातील मंत्री तसेच शासन-प्रशासनाकड़े इको-प्रो ने ३. ९. २०१८ ला दिले होते. हे पत्र पाठ्यपुस्तक मंडळास दिनांक १/ ११/२०१८ रोजी प्राप्त झाले. सदर पत्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास समितीसमोर अभिप्रायार्थ ठेवण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. सुनिल मगर, संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे यांनी पाठविलेल्या उत्तरादाखलच्या पत्रात दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा गोंडकालीन इतिहास आणी ऐतिहासिक वास्तूसाठी ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भ आणि छत्तीसगडपर्यतच्या भुप्रदेशावर या आदिवासी गोंड राज्यांनी तब्बल 550 वर्ष राज्य केले. त्याची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी आदिवासी गोंड़कालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, अनुसुचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. अशोक उइके, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली होती. यावेळी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार केलेल्या पत्रव्यवहार मुळे ही बाब शालेय अभ्यासक्रम मंडळ पुढे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यांत गोंङराज्य होते. या गौरवपुर्ण इतिहासाचे साक्षीदार असणारे किल्ले, परकोट, समाध्या व मंदीरे आजही भक्कम स्थितीत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील ‘चंद्रपूर’ शहरांची निर्मीती 550 वर्षापुर्वी तर 300 वर्षापुर्वी ‘नागपुर’ शहरांची निर्मिती या गोंडराज्यांनी केली होती.
मात्र आदिवासी राज्यांच्या गोंडकालीन इतिहासाची साक्षीदार 'किल्ले' आणि अनेक 'वास्तु' दुर्लक्षीत आणी उपेक्षीत आहेत. सोबतच प्रगल्भ इतिहास असतांना सुध्दा स्थानिक नागरिक सुध्दा हा गोंडकालीन इतिहास विसरत चालले आहेत. आदिवासी गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते. हे सुध्दा आज आम्हाला माहीती नाही ही शोकांतिका आहे.
सदर गोंडकालीन इतिहास विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात येणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात देश आणि जगाचे राजे, त्यांचा कालखंड अभ्यासला जातो. मात्र स्थानिक पातळीवरील इतिहास सांगितला जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील इतिहास अभ्यासक्रमात असणे गरजेचे आहे.
एका मोठया भुप्रदेशावर राज्य करणारे गोंडराजे, त्यांचा पराक्रम, त्यांच्या जगविख्यात वास्तु, राणी हिराईचा राज्यकारभार, बांधलेली मंदिरे, समाधीस्थले अशाप्रकारे कायम दुर्लक्षित ठेवल्यास इतिहासजमा होईल. येथील गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते, याचा इतिहास नव्या पिढींसमोर आला पाहिजे. कायम वनात राहणारे आदिवासी समुदाय संघटित होऊन आपले राज्य निर्माण करतात. दिल्लीपर्यत बादशहापर्यत या राज्यांवर नजर होती, भक्कम किल्ले-परकोटाचे व वास्तुचे बांधकाम करतात, 500-550 वर्ष सतत राज्य करतात ही मोठी अभिमानाची बाब आहे. मात्र, हा इतिहास आजही विदर्भातील अनेक नागरिकांना तसेच देशाला माहीती नाही. निवेदनाची दखल घेत पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास समितीसमोर अभिप्रायार्थ सदर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होण्यासाठी पाऊल पुढे पडू लागलेली आहेत.