जनसामान्यांच्या आरोग्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली
महाआरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीची बैठक
अकोला,दि.17 : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी ३० डिसेंबर २०१८ रोजी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक विश्रामगृह येथे घेण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड, आयएमएचे डॉ. नरेश बजाज, डॉ. संजय धोत्रे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. गजानन नारे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसाम, डॉ. अश्विनी खडसे तसेच आयएएम, निमा, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अकोला शहरातील लालबहादुर शास्त्री स्टेडियमवर महाआरोग्य अभियान आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्याचे निर्देश देवून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
पालकमंत्री म्हणाले, शासन, प्रशासन व लोकसहभागातून महाआरोग्य अभियान यशस्वी करावयाचे आहे यासाठी शासकीय सह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रे, सोनोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रूग्णासाठी औषधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. कुलवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएनशनची मदत घेतल्या जाणार आहे.
गंभीर आजाराचे रुग्ण असल्यास त्यांना मुंबईच्या टाटा, हिंदूजा, बिचकँडी सारख्या सहा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. या रूग्णालयांची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील स्वत: हा संपर्कात असल्याचे सांगितले.