Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०९, २०१८

नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी

नागपूर/प्रतिनिधी:

आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, याचसोबत लघुदाबासाठी प्रतियुनिट 4.55 रुपये (प्रति युनिट 3 रुपये 27 पैसे वीजशुल्क अधिक 1.28 पैसे वहन आकार) या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत व तात्पुरती वीजजोडणी घेत संभाव्य वीज अपघात टाळून सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या लघूदाब वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन (व्हिलींग) आकार असा 4 रुपये 55 पैसे प्रति युनिट असे वीजदर निश्चित केले आहेत. वहन आकारासह हा दर घरगुती वीजदरापेक्षा केवळ 22 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 83 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्यीक वीज जोडणीतून या धार्मिक उत्सवांसाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांकरिता अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीजदराच्या समकक्ष ठेवण्यात आला आहे. नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप महाप्रसाद तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त्तने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 19612, 18002333435 किंवा 18001023435 यावर संपर्क साधावा, याशिवाय संबंधित मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या त्या भागातील अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. 
सार्वजनिक सुरक्षा महत्वाची

नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 

 गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.

दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. 

वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते.

जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे.

वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.