Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८

लोकराज्य वाचक अभियानाला चंद्रपूरमध्ये थाटात प्रारंभ

स्पर्धा परिक्षांच्या यशांचा राजमार्ग लोकराज्य वाचनातून जातो:सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्पर्धात्मक परिक्षांच्या वाचन चळवळीला लोकराज्यने गती आणली आहे. लोकराज्य स्पर्धा परिक्षेमध्ये तयारी करण्यासाठी दर्जेदार वाचन साहित्य आहे. शासकीय नौकरीत येणा-यांनी व स्पर्धा परिक्षेत करीयर घडविण्यात इच्छुक असणा-यांनी लोकराज्यचे वाचन नियमितपणे करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्‍य वाचन अभियान राबविण्यात येत आहे. एकाचवेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये 1 सप्टेंबरला लोकराज्य अभियानाला आज सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाची चंद्रपूर येथील शानदार सुरुवात स्थानिक समाज कल्याण आयुक्त कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. या अभियानाच्या पहिल्या अभिनव कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा समाज कल्याण विभाग, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उपक्रमातील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.  
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टये म्हणजे स्पर्धा परिक्षांसाठी राज्य शासनामार्फत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग राबवित असलेल्या प्रशिक्षणार्थींचा सहभाग, जिल्हयात नव्याने सुरु झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी व समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी यांचे एकत्रित येणे होते. या मेळाव्यामध्ये वेगवेगळया क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांची वैचारिक देवाण-घेवाणही यावेळी झाली. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बी.पी.वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, गृहपाल प्रशांत रामटेके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना समाज कल्याण विभागामार्फत स्पर्धा परिक्षांसाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडण-घडणीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती प्रसाद कुलकर्णी यानी दिली. तर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बी.पी.वाघमारे यांनी या विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची व नोंदणीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांनी वाचाल तर वाचाल या उक्तीचा अर्थ समजून घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी देखील दर्जेदार वाचनासाठी लोकराज्य सारखे अधिकृत वाचन साहित्य संदर्भ म्हणून वापरण्याचे स्पष्ट केले. व्हॉटस्ॲप सारख्या नव्या माध्यमापासून सावध राहण्याचे व योग्य तो वापर करण्याचे सांगितले. तसेच युवा माहिती दूत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.