Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

नगर विकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश : मनपाला आकस्मिक भेट 
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. शिवाय परिसरात स्वच्छता कायम राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्यावे. संसर्गजन्य आजारांमुळे शहरवासीयांना त्रास होउ नये यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
नागपूर परिसरात विविध संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासंर्भात नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरूवारी (ता. २०) नागपूर महानगरपालिकेला आकस्मिक भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपसत्तापक्ष नेत्या वर्षा ठाकरे, उपसत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेविका व प्रतोद दिव्या धुरडे, निगम आयुक्त रविंद्र ठाकरे, अप्पर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक सेवा आरोग्य सेवा डॉ. मिलींद गणवीर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी व मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील म्हणाले, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर आपण ज्याप्रमाणे उपययोजना करतो. तशाच उपाययोजना हे आजार होउ व वाढू नयेत यासाठीही करण्याची गरज आहे. परिसरातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असून आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करून नागरिकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता कशी महत्वाची आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शहरातील विविध एनजीओंचा सहभाग घ्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्त भर देउन जनजागृतीच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करा, असेही निर्देश नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
संजर्गजन्य आजारांबाबत महानगरपालिकेचे दवाखाने रूग्णालयांमध्ये सर्व सोयी, सुविधांवर विशेष भर देउन जनतेला या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. मनपा दवाख्यांनाबाबतची नागरिकांची धारणा बदलण्यासाठी उत्कृष्ठ आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. विविध आजारांवर उपचार करताना इतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना मनपा रुग्णालयांमध्ये बोलावून त्यांचेही सहकार्य घ्यावे. ‘मॉडेल हॉस्पीटल’ तयार करून त्या माध्यमातून नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळावे, यासाठी इतर खासगी डॉक्टरचे सहकार्य घ्या, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया, डेंगी यासारख्या आजारांचा प्रकोप त्यांच्या वाढत्या रुग्णांवरून लक्षात येतो. मनपा किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-यांची संख्याही अधिक असते. या सर्व रुग्णांची माहिती घेउन त्यांच्यावर होणा-या उपचाराचा आढावा घेण्याचीही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती व त्यांच्या आजाराबाबतच अहवाल खासगी रुग्णालये व पॅथॉलॉजीकडून घेण्यात यावे, असेही निर्देश नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. शहरातील दहाही झोनचे आरोग्य अधिकारी, समन्वयक, निरीक्षक या सर्वांची प्रत्येक आठवड्याला बैठक घेउन झोननिहाय आजार, स्वच्छता याबाबतीत आढावा घेण्यात यावा, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
शहरातील आरोग्यासंबंधी चर्चेतून नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडून मिळालेल्या निर्देशावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, असे यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निर्देशित केले. यावेळी मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी नागपूर शहरात मनपा व शासकीय तसेच खासगी दवाखान्यांबाबतची सविस्तर माहिती विषद केली. संसर्गजन्य आजारांवर मनपातर्फे काय कार्यवाही करण्यात येत आहे, याबद्दलची माहिती त्यांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना सादर केली. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.