Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ३१, २०१८

चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी- आ.अशोक उईके
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव
चंद्रपूर/:
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणा-या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी कौतुक केले. यावेळी समितीच्या अन्य आमदार सदस्यांनी या मुलांची मुलाखत घेत एव्हरेस्टच्या आठवणींना जागृती दिली. 
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन चंद्रपूर जिल्हयात तसेच महाराष्ट्रासह देशात आपले नाव लौकीक केले आहे. अशा या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा विधान सभा सदस्य डॉ.अशोक उईके व समितीचे सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे व कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांनी चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली भेट आदिवासी विक्रमविरांची घेतली. समितीच्या सदस्यांनी यावेळी या मुलांना अनेक प्रश्न विचारले. या मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार उच्चपदस्थ नौक-या मिळाव्यात. चांगल्या ठिकाणी त्यांना समाजाचे नेतृत्व करता यावे, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी समितीचे सदस्य आमदार वैभव पिचड यांनी केले. तर अन्य सदस्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. चंद्रपूर ते एव्हरेस्ट हा प्रवास करतांना आलेल्या अडचणी, शासनाकडून झालेली मदत याबद्दलही समिती सदस्यांनी माहिती घेतली. या मुलांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी 16 मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा रोवला होता. याची दखल प्रधानमंत्र्यांनी थेट लालकिल्ल्यावरुन आपल्या भाषणात घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: भेट घेऊन कौतुक केले आहे. राज्य शासनाने देखील एव्हरेस्ट सर करणा-यांना 25 लाख तर एव्हरेस्टवर चढाई करणा-या उर्वरित 5 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयाची मदत केली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला 'ऑपरेशन शौर्य ' च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. आज या मुलांचे समिती सदस्यांनी कौतुक करतांना अप्पर आदिवासी आयुक्त ऋषीकेश मोडक, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 
समितीच्या सदस्यांनी यावेळी कवीदास काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, विकास सोयाम, आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा आज शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला. यावेळी आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे व महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.