Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २६, २०१८

ढगाला लागली कळ;महामंडळाची बस टप-टप गळ

ललित  लांजेवार:
नेहमी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन मिरविणाऱ्या तसेच सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ब्रम्हपुरी आगाराच्या बसला भरपावसात लागलेल्या गळतीमुळे प्रवासी न्हावून निघाले आहेत. ब्रम्ह्पुरीवरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस क्र ( एम. एच. ४०.एम. ८७७२) मध्ये हा प्रकार घडला.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. या पावसाचा फटका ब्रम्हपुरी -चंद्रपूर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. बस आगारातून निघाल्यानंतर १०० किमी समोर गेल्यावर मुल जवळ जोरदार पावसाला सुरूवात झाली. बसच्या छतातून पाण्याची गळती झाल्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. काही प्रवाशांच्या सीटवर पाणी पडू लागल. हे पाणी तुटलेल्या खिडक्यान मधून व बसच्या छतामधून खाली बसलेल्या महिला प्रवाश्यांच्या अंगावर पडू लागले,हा प्रकार एकाच सीटवर घडला नसून बस जवळपास ५ ते ६ ठिकाणहून गळत होती. बसमधील महिला व बालकांना यावेळी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

ऑक्टोंबर २०१७ मध्ये खराब बसेस वापरल्यास, गळक्या बसेसमुळे प्रवासी भिजल्यास कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार त्यामुळे अश्या गळक्या बसेस न वापरण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिलेले होते मात्र ज्या बसेस सेवेतून बाद झालेल्या आहेत,ज्याची फिटनेस लाईफ संपलेली आहे अश्या बसेस ह्या प्रवाश्यांना डोकेदुखी ठरत आहे, 
एसटीच्या १६ हजारांवर बस रोज राज्यातील विविध १८ हजार मार्गांवर धावतात. आर्थिक डबघाईस आलेल्या परिवहन महामंडळाचे सर्वाधिक प्रवासी ग्रामीण भागातच आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नेहमी ओरड होत असते. महामंडळाच्या अनेक बसेसचे छत, साईड बॉडी व खिडक्या खराब असल्याने पावसाळ्यात बसमध्ये पाणी टपकत असते. त्यामुळे प्रवास्यांना गळके पाणी अंगावर घेत प्रवास करावा लागत असल्याचे स्थिती आहे. याबाबत नागरिकांतून व्यक्त होत असलेला रोष लक्षात घेवून मंत्री रावते यांनी ऑक्टोंबर २०१७ मध्ये खराब बसेस न वापरण्याची सूचनाही आगारप्रमुखांना नियंत्रकांना दिल्या होत्या . राज्यात आजही शेकडो बसेस गळक्या व भंगार अवस्थेतल्या रस्त्यांवर धावत आहे मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नाही किंवा प्रवाशांच्या जीवाशी एक प्रकारचा खेळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे
बीड विभागात झाली होती पहिली कारवाई
बीड-लातूर मार्गावर गळकी एसटी सोडल्यामुळे बीड विभागाचे विभाग नियंत्रकांनी संबंधित बसचे काम करणाऱ्या शि.सा.लहाने आणि उ.आ.राऊत यांचे निलंबन केले होते. तर वरिष्ठ प्रभारक मो.रा.गोरे आणि सहायक कार्यशाळा अधिक्षक म.प.लोढा यांच्यावर सदोश बस मार्गस्थ केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केली होती.
त्यामुळे आता ब्रम्हपुरी-चंद्रपूर येथील विभाग नियंत्रकांवर काय कारवाई होते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.