चंद्रपूर येथे जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पदमापूर येथे सल्लागार समितीने सुचविल्याप्रमाणे सफारीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या जंगल सफारीसाठी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा ट्रस्ट ला सोपविण्यात आले आहे. काल यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत ही सफारी तयार करण्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, प्रकल्पातील जी कामे तत्काळ सुरु करता येतील त्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घ्यावी, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून मंजूरी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रकल्पाची माहिती देणारा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.