विज अपघातापोटी नुकसान भरपाईचा धनादेश प्रदान करतांना प्रा, गिरीश देशमुख, सोबत अमित परांजपे व इतर मान्यवर |
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या विद्युत यंत्रणेमुळे शॉक लागून झालेल्या प्राणांकीत आणि अप्राणांकीत अपघाताप्रकरणी मौदा विभागातील चार जणांना एकूण 1 लाख 51 हजाराच्या नुकसान भरपाईचे वाटप नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांच्या हस्ते रवी भवन येथील कुटीर क्रमांक 5 येथे नुकतेच करण्यात आले.
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्या विशेष प्रयत्नांमुळे अपघातग्रस्तांच्या वारसदारांना ही नुकसान भरपाई मंजूर झाली असून कामठी येथील कोळसाटाल येथील मुफ़्तसिल या मुलाचा वीजेचा धक्का लागून अप्राणांकीत अपघात झाला होता, त्याच्या वैद्यकीय इलाजापोटी आलेला खर्च रेशमा परवीन मेहमुद अहमद यांना 60 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सोबतच पारशिवनी तालुक्यातील शरद रमेश यादव यांना त्यांच्या गायीच्या प्राणांकीत अपघातासाठी नुकसनान भरपाईचे तीस हजार, गोंडेगाव येथील सुरेश जोगेश्वर पाली यांना त्यांच्या गाय व बकरीचा वीजेच्या धक्क्याने झालेल्या प्राणांकीत अपघातासाथी 31 हजार तर गहू-हिवरा येथील अशोक देवराव राऊत यांना म्हशीच्या प्राणांकीत अपघातासाठी 30 हजार रुपयांचा धनादेश प्रा. गिरीश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांचेसमवेत प्रितिश वंजारी, अभिजीत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.