पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात मध्यवर्ती (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी शुक्रवारी नागपूर येथे केले.
महावितरणच्या नागपूर परिमंडलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेन्ट्रलाईज बिलिंग पद्धतीची माहिती देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यशाळेत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते, ३९ उप विभागीय अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी. उप विभागातील बिलिंग क्लार्क, माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी,बिलिंग एजन्सीचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे ४०० जणांची उपस्थिती होती . यावेळी पुढे बोलतांना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत म्हणाले , या अगोदर ठरावीक भागातील वीज ग्राहकांच्या मीटरचे वाचन झाल्याशिवाय पुढचे पाऊल उचलण्यात येत नव्हते. पण केंद्रीय बिलिंग पद्धितीमुळे दररोज मीटर वाचन होऊन याची माहिती केंद्रीय प्रणालीत जमा होईल आणि दररोज वाचन झालेल्या मीटरचे देयक लगेचच दुसऱ्या दिवशी वितरित करण्यात येणार आहे. नवीन पद्धत पूर्णतः पारदर्शी आहे.नवीन बिलिंग पद्धतीला समर्थपणे स्विकारुन वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.
वीज ग्राहकांना योग्य पद्धतीने देयके दिल्यास बहुतांश समस्या निकाली निघतील यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी याकडे गंभीरपणे बघण्याचे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले. यासाठी कर्मचाऱ्यांनी निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विश्लेषण केल्यास पुढील काळात या चुका टाळणे शक्य असल्याचे सांगितले. वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक अभियंता मोहमद फुरकान यांनी तर आभार प्रदर्शन नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ यांनी केले.