वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या 8 लाख रूपयाच्या अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून आता 10 लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठी देण्यात येणारे 25 हजार रूपयांचे अर्थसहाय्य वाढवून 40 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल असेही वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या 10 लाख रूपयापैकी 3 लाख रुपये रोख तर उर्वरित 7 लाख रू. मुदत ठेवीच्या स्वरूपात देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनांक 9 जुलै 2018 रोजी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वनमंत्र्यांनी वरील घोषणा केली. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना वनविभागातर्फे करण्यात येत असून प्रामुख्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील वृक्षाच्छादन वाढावे यासाठी 3 वर्षात 50कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाने केला असून यावर्षीच्या पावसाळयात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम जारी आहे. ही मोहीम म्हणजे एक मिशन आहे. या मिशनमध्ये राजकारण न करता वसुंधरेप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाण ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.