Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २७, २०१८

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

Shivsena's Rastaroko movement for farmers' questions in Wardha | वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलनवर्धा/प्रतिनिधी:
 स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून लावण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना सदर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाऱ्यांना पीक कर्ज वितरणाबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे. गत वर्षी गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी. याकालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब तात्काळ बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागण्या सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान रेटून लावण्यात आल्या होत्या. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. मोर्चासह रास्तारोको आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
सरकारविरोधी केली घोषणाबाजी
आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाजपा सरकार सध्या कसे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे याची माहिती दिली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.