Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २५, २०१८

कविता म्हणजे संध्याकाळची दिवेलागण''

झिरोमाईल प्रतिष्ठान आयोजित 'काव्यऋतु' ने रसिकांची मने जिंकली 

नागपूर, ता. 23 :  ''विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण'' किशोरी अमोणकरांच्या या हळव्या ओळींनी कवीसंमेलनाला सुरुवात झाली. साहित्य आणि कला क्षेत्रातील कलावंतांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या ‘झिरो माईल’ कला साहित्य प्रतिष्ठानच्या 'काव्यऋतु-२०१८' कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी साहित्य संमेलन मोरभवन येथील सभागृहात कवींचे काव्य दुमदुमत होते.

उद्‌घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रसेनजीत गायकवाड, अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवियित्री मा. नेहा भांडारकर, संस्थेच्या अध्यक्ष धनश्री पाटील यांची उपस्थिती होती, तर मार्गदर्शक म्हणून अनंत नांदुरकर-खलीश यांनी कवितेवर चिंतनात्मक भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा अनिल यांनी केले तर प्रस्तावनेतून संस्थेबद्दल माहीती संयोजिका वर्षा पतके थोटे यांनी दिली. किरण पिंपळशेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

यानंतर आयोजित कविसंमेलनात विदर्भभरातुन आलेल्या एकूण ३५ कवींनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. ''आत काळजाशी हलले जरासे, लाजला जसा तो पदर पावसाळी'' असा कल्पना विलासी पाऊस तर ''जीव टांगणीले आला नाही पावसाच्या सरी, म्हणे बायको धन्याले कवा बरंसल पाणी ?'' असा भावनाप्रधान पाऊस बरसात राहिला. 'सध्या ती काय करते?' 'सांगा मी कधी ऑनलाईन दिसते?' पासून ते 'धर्मा तू का मेलास बाबा?' असे प्रश्नही कोसळले. ''कोणता  माणूस  आहे  आत  माझ्या, मी  म्हणूनच  आत  नाही  जात  माझ्या'' अशी आत्ममग्न करणारी गझल गाजली, तर हास्यकवितांतून  हास्याचा खळखळाटही होत राहिला. झिरो माईलच्या व्यासपीठावरवरून या कार्यक्रमात अनेकांनी  'पहिल्यांदा कविता सादर केल्या...तसेच समाजात दुर्लक्षित असणाऱ्या कलाकारांना प्रकाशझोतात आणणे या झिरोमाईलचा संकल्प प्रत्यक्षात उतरताना दिसला.

लोकनाथ यशवंत, निरंजन मार्कंडेयवर सारखे दिग्गज कवी तसेच गझल समीक्षक देवदत्त संगेप, गझलकार अझीजखान पठाण, वैश मिर्झापुरे आणि रश्मी पदवाड मदनकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.