४ जुलैपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ही बाब लक्षात घेऊन काही रिसॉर्ट मालकांनी लोकप्रतिनिधींना हाताशी धरून दबाव तंत्राचा वापर करीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळय़ात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) पावसाळी पर्यटनाला स्पष्ट शब्दात नकार दिला असतानाही अशा पद्धतीचे प्रयत्न पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. बक्कळ नफा कमावण्यासाठी व्याघ्र संरक्षणाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे.
व्याघ्र संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता पावसाळय़ात दरवर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पावसाळी पर्यटन बंद असते. मोहर्ली ते ताडोबा हा २० किलोमीटरचा रस्ता सोडला तर कोअर परिसरात पर्यटनाला पूर्णत: बंदी असते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसारच पावसाळय़ात पावसाळी पर्यटनाला मनाई करण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती न लक्षात घेता मुंबई, नागपूर व चंद्रपुरात बसलेले काही रिसॉर्ट मालक दबाव तंत्राचा वापर करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मान्सून पर्यटन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनातही मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील मंत्री व आमदारांची तसेच अतिविशिष्ट लोकांची ताडोबात गर्दी होईल. त्यामुळे व्यवसायात तेजी येईल, या उद्देशानेच ही रिसॉर्टचालकांची लॉबी कामाला लागली आहे. दरम्यान, या वृत्ताने अधिकाऱ्यांच्या वर्तुळात तीव्र नाराजी आहे. पावसाळय़ात शिकारी अधिक सक्रिय राहत असल्याने प्राण्यांच्या रक्षणाकडे अधिक लक्ष दिले जाते. अशाही स्थितीत केवळ मंत्री, आमदार व व्हीआयपींसाठी अभयारण्य खुले ठेवले जाणार असेल तर हा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. विशेष म्हणजे, नागपुरातील वन्यजीव विभागाच्या प्रमुखावरही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी दबाव असल्याची माहिती आहे.