Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०५, २०१८

राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे ऑडिट करणार

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अहमदनगर/प्रतिनिधी:
तीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धी येथे सोमवारी (दि. 4) जाहीर केले. यामुळे शेतीपंपाचा वीजवापर निश्चित होऊन वीजबिलांबाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. 
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी शेतीपंपाचा वीजवापर आणि वीजबिल यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या वीजबिलाबाबत प्रश्न उपस्थित करणारे पत्र ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची तातडीने दखल घेऊन ना. श्री. बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. 
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीपंपाचा वीजवापर निश्चित करण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यात हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून शेतीपंपाची थकबाकी २९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकऱ्यांकडे व्याज, दंड वगळता १८ हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे ना. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. या प्रकल्पाची आणखी तीन मेगावॉटने क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकारात्मक चर्चा व उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्थेला अधिकचे वीजबिल पाठविल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली. कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.