१० झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
तलावातील अतिक्रमण आणि गाळ काढला
नागपूरकरांची चौपाटी म्हणून ओळखला जाणाऱ्या फुटाळा तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. फुटाळा तलावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतानाच तलावातील गाळ काढण्यासही या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रारंभ करण्यात आला.
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सकाळी ७ ते ९ या वेळात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संपूर्ण दहाही झोनच्या सहायक आयुक्तांसह झोनल अधिकारी व झोनमधील कर्मचारी तसेच ग्रीनव्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्व झोनला फुटाळा तलावालगतचा एक-एक परिसर स्वच्छतेसाठी विभागून देण्यात आला होता. स्वत: झोनच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनात संबंधित झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना स्वच्छतेसाठी मिळालेला परिसर स्वच्छ केला. आयुक्त वीरेंद्र सिंह आणि महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण परिसराची आणि अभियानाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
दरम्यान आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी अमरावती मार्गाकडील मंदिरापासून बॉटनिकल गार्डनपर्यंत फुटाळा तलावाच्या पाळीवरून चालत अभियानादरम्यान होत असलेल्या स्वच्छतेची पाहणी केली. तलावात साचलेल्या वनस्पतींना कसे काढता येईल, याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासाठी नीरीची मदत घेता येईल का, याची पडताळणी करा, जसे शक्य आहे ती पद्धत वापरून तलावातील वनस्पती पावसाळ्यापूर्वी काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.फुटाळा चौपाटीवर ठिकठिकाणी कचरा पेटी लावण्यात याव्या. वाढलेल्या झुडपी वनस्पती काढण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, उद्यान अधीक्षक चोरपगार, नासुप्रचे कनिष्ठ अभियंता पंकज आंबोरकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल उपस्थित होत्या.
बॉटल्स, निर्माल्यचा कचरा
मनपा आयुक्त वीरेंद्रसिंह यांना पाहणीदरम्यान तलावात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आणि काचेच्या बॉटल्स आढळल्या. निर्माल्याने तलाव भिंतीलगतचे पाणी अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झालेले आढळले. हा कचरा काढण्याला प्राधान्य क्रम देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.फुटाळा तलावालगत असलेल्या पाळीवर अनेक नागरिक, युवा, लहान मुले फिरत असतात. याच पाळीवर भिंतीला लागून एक उघडी डीपी आयुक्तांना दिसली. त्यातील वायर बाहेर आलेले होते. आयुक्तांनी तातडीने नासुप्रच्या अभियंत्यांना बोलावून तातडीने नवीन डीपी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गोठा, पानठेल्याचे अतिक्रमण हटविले
या सफाई अभियाना दरम्यान तलावाच्या काठावर मंदिराजवळील पाळीवर असलेले पानठेल्याचे पक्के बांधकाम, तलावात पाणी नसलेल्या भागावर बांधण्यातआलेलागोठा आणि तलावातच असलेली एक झोपडी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी भुईसपाट केली.
तलावाचे खोलीकरणही सुरू
परिसर स्वच्छतेसोबतच फुटाळा तलावाचे खोलीकरणही सुरू करण्यात आले. आज मंदिराच्या दिशेने हे खोलीकरण सुरू झाले. पाच जेसीबी आणि चार पोकलॅण्डच्या साहाय्याने गाळ काढण्याची प्रक्रिया आयुक्तासमक्ष सुरू करण्यात आली.
महापौरांनी वाढविला उत्साह
आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी केली. त्यांनी स्वत: संपूर्ण फुटाळा परिसराला फेरफटका मारत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. फुटाळाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी काय मदत हवी ती घ्या पण नियमित स्वच्छता ठेवा, असे त्यांनी सांगितले. यापुढे तलावात निर्माल्य टाकणाऱ्यांवर दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरतीही यावेळी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).