Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २३, २०१८

29 ला चंद्रपूर जिल्हयात तालुकास्तरीय मेळावे

  • शेतक-यांना ऑन दि स्पॉट पीककर्ज वाटप
  • बँक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी शेतक-यांच्या भेटीला
  • आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यात येण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
चंद्रपूर, दि.22 मे – चंद्रपूर जिल्हयात खरीप कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतक-यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून येत्या 29 तारखेला जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. 29 मे च्या या मेळाव्याला शेतक-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना यावर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण जावू नये, बँक व अन्य यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळावे, कुठेही त्यांची अडवणूक होवू नये, यासाठी संपूर्ण प्रशासन आता शेतक-याच्या भेटीला सज्ज असणार आहे. 29 तारखेला प्रत्येक तहसिल कार्यालयात शेतक-यांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया तहसिल कार्यालयातच पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने यासाठी तयारी केली असून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या संदर्भात जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले असून आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतक-यांनी 29 तारखेला तहसिल कार्यालयात येतांना सातबारा (अद्ययावत) गाव नमुना 8-अ, आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड, दोन पासपोर्ट छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला तहसिल कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, सहाय्यक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्राम सेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात सन 2018-19 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज वाटप आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीककर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टाप्रमाणे शेतक-यांनाच मोठया प्रमाणात कर्ज मिळावे, यासाठी या मेळाव्यांचे आयोजन आहे. या सर्व यंत्रणेवर 29 तारखेला जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालणार असून शेतक-यांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
29 तारखेला होणा-या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने शेतक-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
---------------------------

ना.गिरीश बापट यांचा दौरा कार्यक्रम
चंद्रपूर, दि.22 मे- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री हे 23 मे 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

23 मे रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी येथे आगमन व ब्रम्हपूरी येथील धान खरेदी केंद्र, भात गिरणी व सी.एम.आर.स्वीकृती केंद्राना भेटी देवून सकाळी 11.30 वाजता ब्रम्हपूरी येथून वडसाकडे प्रयाण करतील.

---------------------------

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शैक्षणिक
प्रकरणे निकाली काढण्याची मोहीम



चंद्रपूर, दि. 22 मे-चंद्रपूर जिल्हयातील ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,चंद्रपूर यांच्याकडे प्रलंबीत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने समितीशी संपर्क साधून त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी. जेणेकरुन जात वैधता प्रमाणपत्राअभावी पुढील अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होणार नाही.

चालू शैक्षणिक सत्र 2017-18 या वर्षात 12 वी विज्ञान अथवा व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्राच्या प्रस्तावात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वारंवार कळवूनही अद्यापही त्रुटीची पुर्तता न केल्याने न केल्याने सदरील प्रस्ताव प्रलंबीत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सन 2018-19 या वर्षात व्यावसांयीक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना जात वैधता प्रमाणपत्राअभावी अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे प्रलंबीत असलेले प्रस्ताव निकाली काढण्याबाबत शासनाच्या निर्देश आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटीमुळे प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढण्याकरीता उमेदवारांनी त्रुटीची पुर्तता करण्यासाठी सर्व मुळ पुराव्यासह, दस्तऐवजासह या कार्यालयात उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता करण्यासाठी उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 11 ते सांयकाळी 5.00 या वेळेत उपस्थित राहून या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे उपायुक्त दिलिपकुमार राठोड यांनी केले आहे.

------------------------

सन 2017-18 सत्रात प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी
25 मे पासून जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


चंद्रपूर,दि.22- शैक्षणिक सत्र 2017-18 वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2017 होती. त्या दिनांकानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारणे बंद करण्यात आलेले होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विहित दिनाकांपर्यत जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना सन 2018-19या वर्षात 25 मे 2018 पासून आपले परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात यावे.

शैक्षणिक सत्र 2017-18 या वर्षातील व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव 25 मे 2018 पासून सदर प्रस्ताव समितीकडे शासनाच्या www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन त्यांचे अर्ज भरुन पाठवावे. त्याची छापील प्रतीच्या अर्जावर प्रवेशित महाविद्यालयाचा शिक्का व प्राचार्यांची स्वाक्षरी, महाविद्यालयाचे शिफारसपत्र, अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीचादावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचे, विमुक्ती जाती व भटक्या जमातींकरीता 21 नोव्हेबर 1961 पूर्वीचे व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गाचे उमेदवारांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे) महसुली पूरावे सादर करावे.

ज्या उमेदवारांनी आपला प्रस्ताव सादर करतांना सर्वच मुळ दस्ताऐवज स्कॅनिंगकरीता सोबत आणावेत. मुळे दस्ताऐवजांची स्कॅनिंग झाल्यानंतर उमेदवारांना ते लगेच परत करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव संकेतस्थवरुन सादर करतांना काही अडचण असल्यास त्यांनी 18002330444 या मदत केंद्रावर संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे,असे समितीचे उपायुक्त दिलिपकुमार राठोड यांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.