माणूस किती क्रूर कृत्याची परिसीमा गाठू शकतो याचं एक उदाहरण चंद्रपूरात पहायला मिळालंय. चंद्रपुरात ४६ अंश तापमानात एका वृद्धाचे पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील या घटनेने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
४६ डिग्री तापमानात या वृद्धाला पाय बांधून चक्क जमिनीवर उन्हात टाकले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्याची या नर्कातून सुटका झाली.
जिल्ह्याचे तापमान सध्या जगाच्या नकाश्यावर प्रथम क्रमांकावर आहे.सूर्य इथे आग ओकत असतांना येथील एका कॉटरच्या समोर याला मरणासन्न अवस्थेत सोडून देण्यात आले होते,हे चित्र एका व्यक्तीच्या निदर्शनात येताच त्याने चौकशी केली अन संपूर्ण प्रकार समजून घेतला, माहिती मिळाल्यावर माहीत झाले की या वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकतो. नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते. या अमानवीय प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी हस्तक्षेप करून कुटुंबाशी बोलून यातील तथ्य जाणून घेतले.दरम्यान खाण्यासाठी काहीही दिले जात नसल्याने त्याला तिथलीच माती खावी लागत असल्याचे उघड झाले. अखेर पोलिसांनी त्याचे बांधलेले पाय मोकळे करून त्याची सुटका केली आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने खाऊ घातले.
अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात ८० वर्षाच्या या वृद्धाला अशा प्रकारे पाय बांधून ठेवण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या पुढाकाराने या वृद्धाचे जगणे आता सुसह्य होणार आहे.