राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविन्याचा’ या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. यासाठी कल्पक संकल्पना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
शेती, उपजिवीका विकास, पर्यटन विकास व प्रशासन प्रक्रियेतील सुधारणा संदर्भात नागरिकांच्या भन्नाट आयडीया ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाने मागितल्या आहेत. आॅफलाईन, आॅनलाईन पद्धतीने या स्पर्धेत सहभागी होता येणार असून सेतू केंद्र ते ग्रामपंचायत येथे या संदर्भातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाºया नागरिकांकडे अनेक कल्पकता असते. काही प्रयोग त्यांनी स्वत:च्या अनुभवातून सिध्द केले असतात. तर अनेकांना आपल्याकडे सत्ता, प्रशासकीय अधिकार असते तर, असे बदल केले असते, एका दिवसात सगळं बदलून टाकलं असतं, अशी महत्त्वाकांक्षा असते. अशा स्वानुभवातून केलेल्या प्रयोगांना किंवा अफलातून सूचनांना थेट प्रशासनात अंमलात आणण्याचे धाडस जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दाखविले ‘हॅलो चांदा’ नंतर एका नव्या संकल्पाच्या उत्सवाला जिल्हयात सुरुवात झाली आहे. यासाठी १ लाख २ हजार रुपयांच्या रोख पुरस्काराचे नियोजन असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी हॅलो चांदा १८००-२६६-४४०१ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती घेता येणार आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात फिरण्यासाठी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी हिरवी झेंडी दाखवली.