Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०९, २०१८

महिलांनी महिलांचा आदर करावा, स्वत:निर्णय घ्यायला शिकले पाहिजे:ज्योती कपूर

कोराडी/प्रतिनिधी:
 “शिक्षण” हेच महिला सशक्तीकरणाचे मूळ आहे. आपले कौशल्य विकसित करा, निर्णय स्वत: घ्या.  महिलांनी व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन जगत असताना स्वत:च्या आवडी-निवडी, छंद जोपासले पाहिजेत. कारच्या मागच्या सिटवर न बसता स्वत: कारचे चालक बना. आपल्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेच्या परिवाराची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना योग्य सल्ला द्या, शैक्षणिक कार्यात सहकार्य करा. महिलांनी महिलांचा आदर करायला शिकले पाहिजे असे मत ज्योती कपूर यांनी मांडले. महानिर्मितीच्या ३ X ६६० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त त्या बोलत होत्या. 
      याप्रसंगी, मुख्य अभियंता(२१० मेगावाट)राजकुमार तासकर, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, प्रमुख मार्गदर्शक उद्योजक तथा प्रशिक्षक ज्योती कपूर व परवीन तुली, उप मुख्य अभियंते अरुण वाघमारे,गिरीश कुमरवार,किशोर उपगन्लावार प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. अध्यक्षस्थान मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले.
       स्त्रीचा संघर्ष आईच्या उदरापासून जीवनभर चालू असतो. स्त्रियांनी घर-संसार-व्यवसाय सांभाळत असताना स्वत:साठी वेळ काढावा व स्वत:चे कर्तृत्व फुलवावे असे तृप्ती मुधोळकर यांनी सांगितले. याप्रसंगी राजकुमार तासकर, अरुण वाघमारे यांनी समयोचित भाषण केले. यानंतर प्रशिक्षक परवीन तुली यांनी “महिलांच्या विकासातील अडथळे” यावर विचार मांडले. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोराडी वीज केंद्रातील अकरा महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महानिर्मितीच्या १९८० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रत्यक्ष वीज उत्पादनात येथील महिला अभियंते-कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे व येथील महिला शिफ्टमध्ये काम करीत आहेत. मला तो दिवस पाहायला आवडेल, ज्या दिवशी महिला मुख्य अभियंता कुठल्यातरी महानिर्मितीच्या वीज केंद्राची धुरा सांभाळेल असे अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे म्हणाले. प्रारंभी, प्रास्ताविकातून  श्रद्धा घुरडे यांनी महिला दिन आयोजनामागची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन श्रद्धा सुके यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंका टेंभूर्णे यांनी केले.
कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते श्याम राठोड, सुनील सोनपेठकर, जगदीश पवार, भगवंत भगत, डॉ.भूषण शिंदे, संकेत शिंदे कोराडी वीज केंद्राचे अधिकारी-अभियंते तसेच सुमारे २५० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्कृती रहाटे, अरुणा भेंडेकर, विद्या सोरते, सीमा शंखपाळे, प्रियंका अहिरे, प्रांजली कुबडे, शीतल चिंचूरकर, प्रगती घोंगे, प्रसाद निकम, प्रवीण बुटे यांचे मोलाचे परिश्रम लाभले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.