Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०७, २०१८

ITI च्या आॅनलाईन परीक्षेने उडाली विद्यार्थ्यांची तारांबळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
iti online exam साठी इमेज परिणाम

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या परीक्षार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा आॅफलाईन (ओ.एम.आर. शिट) द्वारे घेण्यात येणार होती. मात्र परीक्षा मंडळाने एक दिवस अगोदर परीक्षा पद्धतीत बदल करून आॅनलाईन परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आयटीआयच्या परीक्षार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, तालुका मुख्यालयातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ५ फेब्रुवारीपासून आॅफलाईन परीक्षेचा सुरूवात झाली आहे. मात्र जिल्हा मुख्यालयातीलच खासगी व शासकीय आयटीआयमध्ये आॅनलाईनचा नियम लागू केल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत राज्यभरातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रथम सत्राच्या आॅफलाईन परीक्षेचे वेळापत्रक ५ फेब्रुवारीपासून ठरले होते. मात्र, ही परीक्षा आॅनलाईन घेण्याचे निर्देश ३ फेब्रुवारीला सायंकाळी शासकीय आयटीआयला प्राप्त झाले. दुसºया दिवशी रविवार असल्याने ही माहिती इतर आयटीआयपर्यंत पोहचू शकली नाही.
सोमवार ५ फेब्रुवारीला सर्व परीक्षार्थी आॅफलाईन परीक्षा देण्यासाठी केंद्रावर गेले असता, आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. मात्र हिच परीक्षा तालुका मुख्यालयातील आयटीआयमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार आॅफलाईन सुरू झाली आहे. केवळ जिल्हा मुख्यालयातील शासकीय व खासगी आयटीआयसाठी आॅनलाईन परीक्षेचा नियम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही परीक्षा ठरल्याप्रमाणे आॅफलाईन घ्यावी, अशी मागणी शुभम झाडे, सुभाष साव, गौरव पारेवार, शुभम गेडाम, मयुरी आत्राम, स्वाती मेश्राम, यास्मीन शेख यांनी पत्रकार परिषदेत केली. सम्यक विद्यार्थी आंदोलन समितीच्या शिष्टमंडळानेही जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी धिरज तेलंग, धिरज बांबोळे, विनोद बोरीकर, अक्षय लोहकरे आदी उपस्थित होते.
संगणक ज्ञान नसलेल्यांची आॅनलाईन परीक्षा
आॅफलाईन परीक्षेत बदल करून आॅनलाईन परीक्षेचे निर्देश असले तरी आयटीआयच्या ३५ व्यवसायांपैकी ज्या व्यवसायाचा संबंध संगणकाशी येतो, त्यांची परीक्षा आॅफलाईन आणि ज्यांचा संबंध संगणकाशी येत नाही, त्यांची परीक्षा आॅनलाईन घेतली जात आहे. आयटीआय करणारे अनेक परीक्षार्थी हे पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. त्यांनी यापुर्वी कधीही संगणक हाताळले नसताना व कोणतीही पुर्वतयारी केली नसताना त्यांना आता आॅनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.
आॅनलाईन परीक्षेसाठी देणार आता प्रशिक्षण
५ फेब्रुवारीपासून सुरू होणारी आॅफलाईन परीक्षा रद्द करून १९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र अनेक परीक्षार्थींना संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना ८ ते १८ फेब्रुवारीपर्यंत संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र आॅनलाईन परीक्षेसाठी अनेक आयटीआयमध्ये संगणक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळेच तालुका मुख्यालयातील आयटीआयटीची आॅफलाईन तर जिल्हा मुख्यालयातील आयटीआयची आॅनलाईन परीक्षा होणार आहे. मात्र तालुका मुख्यालयासारखीच जिल्हा मुख्यालयातील आयटीआयची स्थिती आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.