चिमूर/प्रतिनिधी:
अंहिसा चौक ते नेहरू चौक परीसरात भरणारा दैनदिन भाजीपाला बाजार हुतात्मा स्मारक अभ्यंकर मैदान येथे हलविण्याकरिता नगर परीषदेने फर्माण काढले. आता भाजीपाला व्यावसायिकांना तेथे बळजबरीने नेले जात आहे. या जाचाला कंटाळून अखेर भाजीपाला विक्रेत्यांनी दैनदिन भाजीपाला गुजरी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चिमूर शहरातील दैनदिन गुजरी हुतात्मा स्मारक अंभ्यकर मैदान येथे अनेक वर्षांपासून भरत होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केल्याने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने ही गुजरी अहिंसा चौक ते नेहरू चौकात हलविली. तसेच यापूर्वी नेहमी यात्रा काळात नेहरू चौकापासून मुख्य रस्त्यावरच गुजरी भरायची. मात्र आता रहदारीला अडथळा होतो, या सबबीखाली नगर परिषदेने गुजरी अभ्यंकर मैदान येथे नेण्याचा घाट घातला आहे. व्यावसायिकांनीही अभ्यंकर मैदानात काही दिवस गुजरी भरविली. मात्र या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने पुन्हा भाजीपाला व्यावसायिक अहिंसा चौक ते नेहरू चौक येथेच परत आले. आता त्यांना पुन्हा अभ्यंकर मैदानात पाठविले जात आहे. २४ जानेवारीला भाजीपाला विक्रेत्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. रोजच भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेच्या पथकाने उठविणे सुरू केले आहे. ३१ जानेवारीला तर या पथकाने व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करून कारवाई केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून सर्व भाजीविक्रेत्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली व रविवारपासून दैनंदिन भाजीपाला मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय त्यांनीच ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात जाहीर केला. बाहेरगावावरून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही दुकान लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भातील एक निवेदन भाजीपाला व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
गृहिणींना चिंता
शहरातील भाजीमार्केटच बंद असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. शहरात कुठेही भाजीपाला मिळत नसल्याने घरगृहस्थी कशी चालवायची, यात्रा काळात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा, या विवंचनेत गृहिणी आणि नागरिकही दिसून येत आहेत.