- कर आकारणी समितीच्या बैठकीत निर्देश
नागपूर, ता. ८ : प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि विवादित मालमत्तांकडे असलेल्या थकीत करासंदर्भात तातडीने कार्यवाही करा. ठोस निर्णय घ्या आणि मार्चपूर्वी वसुली करा, असे निर्देश कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात गुरुवारी (ता. ८) कर आकारणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला समितीच्या उपसभापती यशश्री नंदनवार, सदस्य सोनाली कडू, वंदना भुरे, परसराम मानवटकर, तानाजी वनवे, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, गणेश राठोड, प्रकाश वऱ्हाडे, अशोक पाटील, राजेश कराडे, राजू भिवगडे, हरिश राऊत, सुभाष जयदेव, सुवर्णा दखने, स्मिता काळे उपस्थित होत्या.
सभापती अविनाश ठाकरे यांनी झोननिहाय शासकीय मालमत्ता, विवादित मालमत्ता आणि न्यायालयात प्रविष्ठ असलेल्या प्रकरणासंदर्भात आढावा घेतला. या मालमत्तांच्या वसुलीचा आकडा मोठा असून त्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश त्यांनी दिलेत. यापूर्वी झोननिहाय घेतलेल्या बैठकीत ठरविल्याप्रमाणे झोन कार्यालयातून किती मालमत्तांना पेशी नोटीस गेली, कितींवर सुनावणी झाली आणि त्यातून किती वसुली झाली याबाबतचाही आढावा सभापती ठाकरे यांनी घेतला.
कर निर्धारण झालेल्या मालमत्तांचे
१८ पर्यंत डिमांड पाठविण्याचे निर्देश
बैठकीत प्रारंभी मालमत्ताचे सर्वेक्षण करणारी कंपनी सायबरटेकच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेबाबतचा आढावा घेण्यात आला. सायबरटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २,४३,१३६ मालमत्तांची माहिती एकत्रित झाली असून १,७३,६८३ मालमत्तांना कराची डिमांड पाठविण्यात आली आहे. कर निर्धाण झालेल्या उर्वरीत मालमत्तांच्या डिमांड १८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
- मोबाईल ॲपचे सादरीकरण