Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०४, २०१८

उमरेड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात निर्णय -मुख्यमंत्री

नागपूर : उमरेड येथे औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला विपुल प्रमाणात कोळसा तसेच वीज उत्पादनाचा खर्च कमी होण्यासोबतच या परिसरातील सुमारे दहा हजार लोकांना रोजगार निर्माण होत असल्यामुळे उमरेड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे दिली.

उमरेड नगर परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय शॉपिंग मल्टीपर्पज हॉलचे (नाट्यगृह) लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, विकास महात्मे, आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

उमरेड नगर परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापूर्वी 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला असून आणखी 15 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील स्वच्छ शहर म्हणून शहराचा विकास करा. उमरेडला राज्यस्तरावर हागणदारीमुक्त शहर म्हणून गौरविण्यात आले असल्याचे सांगताना शहरातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नागपूर नागरी रेल्वेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर-उमरेड या सिमेंट मार्गासोबतच रस्त्याचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला असून पुनर्वसनासाठीही आवश्यक असलेला संपूर्ण निधी देण्यात येईल, परंतु आदर्श पुनर्वसन करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण व शहरी भागातील चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य कक्षाच्या माध्यमातून दुर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी निधी देण्यात आला असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी जनआरोग्य योजना जाहीर केली असून 50 कोटी लोकांना खाजगी रुग्णालयात 5 लक्ष रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञताछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उमरेड तालुक्यातील सुमारे 11 हजार 836 शेतकऱ्यांना 65 कोटी रुपयाची कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, श्रीफळ तसेच नांगराची प्रतिकृती भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. 

गोरगाव कलांद्री येथील केशव शंकर बानाईत, मांढळ येथील रामकृष्ण निरगुळकर व सिलेपार येथील संभाजी घरड व राजू बाळबुधे आदी शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील 30 वर्षापेक्षा जुने औष्णिक वीज प्रकल्प नियमानुसार बंद करण्यात येणार असून नव्याने उमरेड येथील वीज प्रकल्पाला मंजुरीचा प्रस्ताव आहे. नाग नदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन 1200 मेगावॅटचे दोन प्रकल्प सुरु होऊ शकतात.

शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध राहणार आहे. उपसा सिंचनासाठी दिवसा 12 तास ही सौरऊर्जेच्या माध्यमातून तर 12 तास औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून मिळणार आहे. चिंचघाट उपसा सिंचनामुळे साडेसहा हजार शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळू शकेल. आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच शहराचे जिओ मॅपिंग करण्याचे काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सां‍गितले.

आमदार सुधीर पारवे यांनी यावेळी उमरेड मतदारसंघातील सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.