प्लॉस्टिकमुक्त मोहिमेची अंमलबजावणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:शहरातील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा. रहिवाशांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लागावी, या विधायक हेतूने चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिक, नगरसेवक, नगरसेविकांना कापडी पिशव्या वाटप करून प्लॉस्टिकमुक्त शहर संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात आली.
चंद्रपूर महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्यावर उपाय सुचवलेला नाही. त्यामुळे चोरून लपून व्यापारी, विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. आयुक्तांनी आदेश दिले की तेवढय़ा वेळेपुरते पालिका कर्मचारी प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मोहीम राबवीत आहेत.
त्यामुळे महापालिकेचा प्लॅस्टिक बंदीचा हेतू अजिबात सफल झालेला नाही. रेल्वे स्थानक भागातील प्रत्येक फेरीवाल्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांचे साठे पडलेले असतात. तरी पालिका कर्मचारी ते साठे जप्त करीत नाहीत, केंद्र शासनाने २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान सुरु केले. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली करण्यासाठी चंद्रपूर स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी लोकसहभागाद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत.शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत चांगली सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून प्लॉस्टिकमुक्त संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास प्रयत्न सुरू आहेत, असा दावा महापौर अंजली घोटेकर यांनी केला.
मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१७ स्पर्धेत चंद्रपूर शहर राज्यातून सहावे व विदर्भातून पहिले आले होते. दररोज वापरातील प्लॉस्टिक पिशव्या नैसर्गिक व जैविकदृष्ट्या विघटनशील नाहीत. आरोग्यास हानिकारक आहेत. मात्र, प्लॉस्टिक उत्पादने दररोज वापरून उघड्यावर फेकले जाते. त्यामुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने प्लॉस्टिकपिशव्या तसेच थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तूंवर राज्यात निर्बंध घालण्यात आले. याच धोरणाचा भाग म्हणून महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियानाअंतर्गत नागरिकांना कापडी पिशव्या दिल्या जात आहे. या उपक्रमाला आयसीआयसीआय बँकेने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणून आर्थिक योगदान देत आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, नगरसेविकांना प्रत्येकी ३०० पिशव्या देण्यात आल्या असून प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे.