*दणका युवा संघटनेचे किरपान यांचे आमरण उपोषण सुरू * तात्काळ पदावरून हटवावे
व खोटी माहीती दिल्याबद्दल * पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी *
सहायक निबंधकानीही केले आरोपांवर शिक्कामोर्तब
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आली.
त्यांनी आपला धंदा शेती असल्याची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशी नागपुरचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांनी चौकशी केली व तसा अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांना पाठविण्यांत आला मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने दणका युवा संघटनेचे रामटेक तालुका अध्यक्ष अजय किरपान यांनी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारासमोर आज दिनांक 5 फेबु्रवारी 2018 रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अशासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोषणा केली. तसे अधिकृत आदेश नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले व अन्य प्रशासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला. रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे शिक्षकाच्या नोकरीवर आहेत ते या पदावर कसे काय राहू शकतात असा प्रश्न अजय किरपान यांनी उपस्थित केला होता. कोल्हे यांना तात्काळ पदावरून दूर करावे व खोटे शपथपत्र सादर केल्याबाबत पोलीसांत तक्रार दाखल करावी अशी मागणी रामटेक दणका युवा संघटनेने रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे व जिल्हानिबंधक सतीश भोसले यांचेकडे लेखी तक्रार देवून केली होती. मात्र शासनाकडे तसे अधिकार असल्याने आपण चौकशी करून तसा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यांत आल्याचे भोसले यांनी सांगीतले.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम 41(1) जी च्या तरतुदीनुसार शासकीय सेवक किंवा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी असेल तर तो बाजार समीतीचा पदाधिकारी होवू शकत नाही असा स्पष्ट नियम असतांना अपात्र मानसाला नियुक्त करण्यात आले ही चुक सुधारण्याऐवजी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यापुर्वी अजय किरपान यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून केला आहे. याप्रकरणी रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांनी चौकशी केली व त्यानुसार किरपान यांनी केलेले सर्व आरोप खरे असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक नागपुर यांना सादर केला.
तरीही कोल्हे यांना पदावरून हटविण्यासाठी विलंब का लागत आहे असा प्रश्न अजय किरपान यांनी उपस्थित केला आहे. नेमके कोणाचे राजकीय दडपण या अधिकारींवर आहे. दबाव आहे म्हणून चुकीची नियुक्ती वैध ठरवायची का? हा सत्ताधिशांचा आपल्या अधिकाराचा दुरूपयोग नाही कां? असे अनेक प्रश्न यानिमीत्ताने रामटेक तालुक्यांत विचारले जात आहेत.यापुर्वी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीने कधीही स्वखर्चाने दिनदर्शिका छापल्या नाहीत मात्र यावेळी पहील्यांदाच नवे प्रशासकीय मंडळ पदारूढ होताच ४८ हजार रूपयांचा खर्च करून केवळ स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यासाठी या दिनदर्शिका छापण्यात आल्याची चर्चा केली जात आहे. सोबतच दोन खुर्च्या 14000 रूपये व आभाराची जाहीरात वृत्तपत्रांत रूपये 11500 एकूण 73500 एवढा नियमबाहय खर्च करण्यांत आल्याचा आरोप किरपान यांनी यावेळी केला. आपण उपोषण करू नये यासाठी वेगवेगळया तर्हेने दबाव टाकण्याचा प्रयत्न अनिल कोल्हे यांनी केल्याचा आरोप किरपान यांनी केला आहे. त्यांचेसोबत समाजसेवक राजेश जयस्वाल हे उपोषणावर बसले आहेत
.दणका संघटनचे संस्थापक व माजी जि.प.सदस्य योगेश वाडीभस्मे,माजी आमदार अॅड.आशिष जयस्वाल,माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, माजी सभापती बालचंद बादुले,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष संजय मुलमुले,नरेंद्र बंधाटे,आदी मान्यवरांनी उपोषण मंडपाला भेट दिली.